सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाचा कारभार नेमका चाललाय तरी कसा? असा संतप्त सवाल उपस्थित करत माजी तालुकाध्यक्ष तथा सरपंच सेवा संघाचे पदाधिकारी गुरुदास गवंडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेदरम्यान एका अधिकाऱ्याला चक्क मोबाईलवर मटका जुगाराचे आकडे पाहताना पाहिल्याचा गंभीर आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
“ज्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी प्रश्न मांडत आहेत आणि अधिकारी मात्र सभेत मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त आहेत, त्या जिल्ह्याचा विकास तरी कसा होणार?” असा संतप्त सवाल गवंडे यांनी उपस्थित केला.
प्रशासक राज लागू झाल्यापासून अधिकाऱ्यांची मनमानी वाढली असून ग्रामपंचायत दप्तर तपासणीसारखी मूलभूत कामेही मागील दोन वर्षांत किती वेळा झाली, याचा हिशोब प्रशासनाने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
गवंडे म्हणाले, “जर लोकप्रतिनिधींनाच अधिकाऱ्यांना कामाची आठवण करून द्यावी लागत असेल, तर आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचा नेमका उपयोग काय? सामान्य माणसांची कामे दोन-दोन वर्षे रखडलेली आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अजूनही वाळू मिळालेली नाही. शासन परिपत्रके काढत आहे, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे.”
काही दिवसांपूर्वी कुडाळ पंचायत समिती बैठकीतही अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, “या जिल्ह्यात अधिकारीच लोकप्रतिनिधींपेक्षा मोठे असल्याचा आव आणत आहेत. पालकमंत्री अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेत असल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर त्यांचा वचक दिसत नाही.”
प्रशासनाच्या कारभारावर उपरोधिक टीका करत गवंडे म्हणाले, “जर मटक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढत असेल, तर सरकारने मटका व्यवसाय अधिकृतच करावा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे हेच वातावरण आहे.”
तसेच, “जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी ‘अर्धवेळ मटका कसा खेळायचा’ यावर मनोरंजनात्मक कार्यशाळाच आयोजित करावी,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, या आरोपांमुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



