सावंतवाडी : माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी आणि लोकहितवादी वापर करून सर्वसामान्य, पीडित व शोषित नागरिकांना न्याय मिळवून देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते सुशिल रूपाजी चौगुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सावंतवाडीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव – असंघटित लोककलांचा महोत्सव” या भव्य सांस्कृतिक सोहळ्यात हा गौरव सोहळा पार पडला.
सावंतवाडी येथील ऐतिहासिक बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रंगलेल्या या महोत्सवात कला, संस्कृती आणि समाजकारण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. लोककला आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रमात सुशील चौगुले यांच्या उल्लेखनीय कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे माहिती अधिकाराच्या माध्यमातून शासन-प्रशासनातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला असून भ्रष्टाचार, दिरंगाई आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांविरोधात त्यांनी निर्भीड भूमिका घेतली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीमुळे अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचले आणि त्यातून सामान्य माणसाला दिलासा मिळाला. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी मांडलेली परखड भूमिका समाजमनाला दिशा देणारी ठरली आहे.
या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मराठी चित्रपट व नाटकाच्या सेन्सॉर बोर्ड सदस्य विजय चव्हाण यांच्या हस्ते सुशील चौगुले यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सभागृहात उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याला सलाम केला.
कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी अभय नेवगी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, रामदास पारकर, भरत गावडे, म. ल. देसाई, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, गुंडू साटेलकर, ॲड. पी. डी. देसाई, विठ्ठल कदम, आर्यन देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. चौगुले यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि न्यायासाठी लढण्याच्या वृत्तीचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, सुशिल चौगुले यांच्या या सन्मानाबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता तसेच विविध संघटनांच्या स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



