सिंधुदुर्ग : सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी परब-राणे यांची निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला उपाध्यक्षपदी स्तुत्य निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानसी परब-राणे या गेली अनेक वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करत आहेत. सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणे, गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देणे, शैक्षणिक उपक्रम राबविणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे तसेच कामगार कल्याणाच्या विविध योजनांसाठी सातत्याने प्रयत्न करणे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामध्ये समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतो.

विशेष म्हणजे, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा दिली असून युवकांनाही सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि संघटन कौशल्यामुळे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
मानसी परब-राणे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल विविध सामाजिक संस्था, संघटना आणि प्रतिष्ठित मंचांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, विविध स्तरांवर त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. समाजहितासाठीची त्यांची धडपड आणि सातत्यपूर्ण कार्य पाहता त्यांची जिल्हा महिला उपाध्यक्षपदी झालेली निवड ही संस्थेसाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
या निवडीबद्दल निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्याच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मानसी परब-राणे यांच्या या निवडीचे सामाजिक, शैक्षणिक, महिला संघटना तसेच विविध क्षेत्रांतून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



