“विकासाच्या गप्पा अन् आरोसची दुर्दशा!”, संतप्त ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ग्रामपंचायतीवर हल्लाबोल! ; रस्ते खड्ड्यात, पाणीटंचाई तीव्र अन् विजेचा लपंडाव, उबाठा शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरत तात्काळ कारवाईचा इशारा.

सावंतवाडी : “देश विकसित राष्ट्र बनवण्याची स्वप्ने दाखवली जात असताना आरोस गावातील नागरिक मात्र अजूनही पाणी, वीज आणि रस्त्यासाठी हेलपाटे मारत आहेत,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोस ग्रामपंचायत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. गावातील रखडलेल्या मूलभूत समस्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत धडक देत प्रशासक आणि ग्रामसेवकांना थेट जाब विचारला.

आरोस गावात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, तीव्र पाणीटंचाई आणि विजेचा सतत सुरू असलेला लपंडाव यामुळे ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. याच महिन्यात कळंगुटकरवाडी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल न झाल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी तीव्र झाला आहे.

दिनांक २५ मे २०२६ रोजी उबाठा शिवसेनेचे न्हावेली-मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचे विभागप्रमुख गुरुनाथ साबाजी नाईक यांनी ग्रामस्थांसह आरोस ग्रामपंचायतीत जाऊन प्रशासक शंकर नाईक आणि ग्रामसेवक कुबल यांची भेट घेतली. यावेळी निवेदनाद्वारे गावातील रखडलेल्या प्रश्नांबाबत प्रशासनाला धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

गावातील मुख्य रस्ते अक्षरशः खड्ड्यांत गेले असून प्रवास करणे जीवघेणे बनले आहे. विशेष म्हणजे आरोस गावातील अनेक तरुण-तरुणी नोकरीनिमित्त दररोज गोव्यात ये-जा करतात. मात्र रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था त्यांच्या सुरक्षेलाच मोठा धोका निर्माण करत असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. “रस्त्यावर वाहन चालवायचं की खड्डे चुकवायचे?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

त्याचबरोबर गावातील निकृष्ट वीज वितरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी मांडला. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अभ्यासात अडथळे निर्माण होत असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थांनी मुख्य रस्ता आणि माऊली मंदिर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करताच संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याचे प्रशासकांनी सांगितले. तसेच गिरोबावाडी येथील प्रसाद नाईक यांच्या घराशेजारील विहीर तात्काळ साफ करून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. नाबरवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात आल्याची माहितीही ग्रामसेवकांनी दिली.

मात्र, “आश्वासनांची खैरात पुरे झाली; आता प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत,” असा इशारा देत उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्यासमवेत उपसरपंच प्रसाद नाईक, यशवंत सावंत, गणपत नाईक, प्रकाश परब, लक्ष्मण सावंत आणि अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटत असून, रखडलेल्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles