सावंतवाडी : “इन्सुलीत वाळू उपसा दिसत नाही का?, की हप्ते घेतात?” अशा आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकुरामुळे संतप्त झालेल्या इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितीन राऊळ यांनी आता थेट कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीकडून व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टविरोधात त्यांनी बांदा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, संबंधित आरोपीला तातडीने शोधून काढण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
घडलेल्या प्रकारानुसार, वाफोली येथे सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननाबाबत ग्रामस्थ विठ्ठल कळंगुटकर यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने नितीन राऊळ यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती. यानंतर राऊळ यांनी तत्काळ सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना माहिती दिली. प्रशासनानेही त्वरित कारवाई करत संबंधित डंपर आणि जेसीबी ताब्यात घेतले.

मात्र, या कारवाईनंतर सोशल मीडियावर एक वादग्रस्त मेसेज व्हायरल झाला. “डंपर आणि जेसीबी पकडून तहसीलदारांच्या ताब्यात देणे चुकीचे असून, त्यावरील दंडात्मक कारवाईची जबाबदारी विठ्ठल कळंगुटकर आणि नितीन राऊळ यांनी घ्यावी,” असा मजकूर त्या पोस्टमध्ये होता. इतक्यावरच न थांबता, “इन्सुलीत सुरू असलेला वाळू उपसा दिसत नाही का?, की हप्ते घेतात?” असा थेट आरोप करत राऊळ यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नितीन राऊळ यांनी बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांची भेट घेत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. “जर सात दिवसांच्या आत संबंधितांनी पुराव्यासहित कोणाकडून हप्ते घेतले हे सिद्ध केले नाही, तर न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.



