“महावितरण झोपलं होतं का?”, सावंतवाडीत संतप्त नगरसेवकांचा कार्यालयावर धडक मोर्चा. ; पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

सावंतवाडी : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या विजेच्या संथ आणि विस्कळीत कामांमुळे सावंतवाडीकर अक्षरशः हैराण झाले आहेत. दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला असून संतप्त सत्ताधारी नगरसेवकांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक दिली. “पावसाच्या तोंडावरच कामे का निघतात?, इतके दिवस तुम्ही झोपला होता का?” अशा आक्रमक शब्दांत अधिकाऱ्यांना जाब विचारत, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. आंदोलनात भाजप शहराध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, विलास जाधव, दिलीप भालेकर, नागेश जगताप, कृणाल शृंगारे आदी उपस्थित होते.

शहरात सध्या वारंवार वीज खंडित होत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गासह व्यावसायिक आणि गृहिणींचे मोठे हाल होत आहेत. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरणही लोकप्रतिनिधींना संतापजनक वाटले. शहराला दोन फिडरवरून वीज पुरवठा होत असून दोन्ही फिडर एकाच वेळी कार्यरत असल्याने, एका भागात काम सुरू असताना सुरक्षिततेच्या कारणास्तव संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बंद करावा लागत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. मात्र या उत्तरावर उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नगरसेवक आनंद नेवगी यांनी शहरातील जीर्ण विद्युत खांबांचा मुद्दा उपस्थित करत महावितरणच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. यापूर्वी वीज वाहिनी अंगावर पडून दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही का?, पुन्हा एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहात का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

नगरसेविका सुकन्या टोपले यांनी मिलाग्रीस हायस्कूलसमोरील जीर्ण खांब गटारात कोसळून एका विद्यार्थिनीला दुखापत झाल्याची गंभीर घटना उघडकीस आणत संबंधित खांब तात्काळ हटवण्याची मागणी केली.

भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनीही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. “पालिकेत दोनदा बैठक घेऊन, वारंवार अहवाल मागवूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्ती काढून जनतेला वेठीस धरले जात आहे. दिवसभर कार्यालयात बसून नेमके काय करता?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावर उपअभियंता शैलेश राक्षे यांनी कर्मचाऱ्यांची टंचाई आणि खाजगी कामगार उपलब्ध नसल्याची अडचण मांडत, उपलब्ध यंत्रणेद्वारे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी थेट कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून शहरातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

“आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू. शहरवासीयांवर अन्याय सहन केला जाणार नाही. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहिला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा सज्जड इशारा बबन साळगावकर यांनी शेवटी दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles