सावंतवाडी: अन्न सुरक्षा अधिकारी, सिंधुदुर्ग तथा अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसरात असलेल्या साई श्रद्धा पान-बिडी स्टॉलवर छापा टाकून ४ हजार २२५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
ही कारवाई महादेव बाबा कळणेकर व दत्तात्रय बाबा कळणेकर यांच्या मालकीच्या स्टॉलवर करण्यात आली. छाप्यामध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला गुटखा आढळून आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संपूर्ण माल ताब्यात घेतला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून सावंतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महादेव बाबा कळणेकर व दत्तात्रय बाबा कळणेकर यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून अशा कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



