सीटू स्थापना दिन चिरायू होवो! – सिंधुदुर्गातील शेकडो आशा, गटप्रवर्तक, स्त्री परिचर आझाद मैदानावर महाआक्रोश आंदोलनात सहभागी होणार! – कॉ. विजयाराणी पाटील. ; सिंधुदुर्गातील महिलांचा प्रॉव्हिडंट फंड सरकारला द्यावाच लागेल! : कॉ. विनोदसिंह पाटील.

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने सीटू स्थापना दिन निमित्ताने ओरोस येथे जिल्हा मेळावा घेण्यात आला. 1 जून 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या महाआक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

गटप्रवर्तक व आशा यांना प्रॉव्हिडंट फंड मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दाखल करण्याचे ठरले.

 

सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत युनियनच्या सचिव कॉ प्रियांका तावडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी युनियनच्या व राज्य फेडरेशनच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

 

कॉ. विनोदसिंह पाटील यांनी सीटू संघटनेची स्थापना, उद्दिष्ट, ध्येयधोरणे व संघटनेचे कामकाज याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकरी, शेतमजूर, कामगार व कर्मचाऱ्यांना संघटित करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वर्गसंघर्ष उभा करणे, हे CITU चे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 1970 पासून आतापर्यंत गेल्या 56 वर्षांमध्ये सीटू ने कामगारांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विविध युनियनच्या माध्यमातून अनेक लढे उभारले व कर्मचारी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. सीटू ही वर्गीय संघटना जात, धर्म व वंश याच्या आधारे संघटित न होता वर्गसंघर्ष हे ब्रीद घेऊन कार्यरत आहे. समाजवाद, साम्यवाद, सरकारी मालकी, राष्ट्रीयकरण आणि त्यातून जनतेचा विकास ही भूमिका घेऊन CITU सातत्याने काम करत आहेत. आशा, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, ॲम्बुलन्स ड्रायव्हर, अंगणवाडी कर्मचारी, घर कामगार, यंत्र कामगार, ऊस तोडणी कामगार, बांधकाम कामगार आणि अशा अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्याचे काम सिटू ने केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा कॉ विजयाराणी पाटील यांनी सांगितले की, आशा व गटप्रवर्तक यांनी संघटित होऊन आत्तापर्यंत अनेक लढे यशस्वी केले व ऐतिहासिक यश पदरात पाडून घेतले आहे. अशाच पद्धतीने इथून पुढे सुद्धा संघटित राहून तळागाळातील वर्गीय एकजूट मजबूत केल्यास सर्वच असंघटित कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आशा, गटप्रवर्तक, स्त्री परिचर, पोषण आहार कामगार या असंघटित कामगारांना प्रॉव्हिडंट फंडाचा लाभ मिळत नाही. म्हणून सीटू ने या विरोधात कायदेशीर लढाई करण्याचे ठरवले आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल करून या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच 1 जून 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या आशा, गटप्रवर्तक, स्त्री परिचर, शालेय पोषण आहार, ॲम्बुलन्स ड्रायव्हर, वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या महाआक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सभासद महिलाने घोषणांच्या निनादात हे आंदोलन यशस्वी करण्याचा नारा दिला.

दुसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये आशा वर्कर्स यांनी चळवळीतील विविध गीतगायन, समूहगीत गायन, काव्यवाचन, एकपात्री अभिनय या कलाप्रकारातून आशा व गटप्रवर्तक यांचे कष्टाचे व जोखमीचे काम आणि त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हा कमिटीने चांगले सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles