– जिजाऊ संस्थेच्या रत्नागिरीतील मोफत रुग्णालयाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न.
– ॲड. नकुल पार्सेकर लिखित ध्येयधुंद पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचेही दिमाखदार प्रकाशन.
रत्नागिरी : कोकणातील तरुणांमध्ये अफाट क्षमता दडलेली असून योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते समाज व देशाच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतात. अशा गुणी व्यक्तींना शोधून त्यांना घडविण्याचे काम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि तिचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे करत आहेत. ते खऱ्या अर्थाने “रत्नपारखी” असून त्यांच्या कार्यातून अनेक तरुणांना नवी दिशा मिळत आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले. रत्नागिरी येथील वीर सावरकर सभागृहात आयोजित श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

श्री. प्रभू म्हणाले, समाजासाठी झोकून देणारे अधिकारी फार कमी असतात. मात्र, असे अधिकारी जिजाऊ संस्थेसाठी कार्य करताना दिसतात. सामाजातील विविध घटकांसाठी निलेश सांबरे करत असलेलं काम पाहून कौतुक वाटते. ते रत्नपारखी असून त्यांच्या कार्यातून अनेकजण आगामी काळात नैपुण्य दाखवतील. समाजातील गोरगरीब मुलांना स्वतःच मूल समजून ते करत असलेल कार्य उल्लेखनीय आहे. कोकणातील क्षमतेचा देशाला अन् गावाला निश्चितच फायदा होईल, निलेश सांबरे यांचा आदर्श घेऊन काम केल्यास समाज मागे राहणार नाही. तसेच आगामी काळात नोकऱ्या नष्ट होण्याची परिस्थिती असताना नवीन विचाराने पुढे जाणं आवश्यक आहे. व्यवसाय, उद्योगाकडे देखील तरूणांनी वळले पाहिजे, याचही प्रशिक्षण जिजाऊ संस्था देत आहे. त्यामुळे कोकणी माणूस कुठेही मागे राहणार नाही. यासाठी जिजाऊ सारख्या संस्था आणि निलेश सांबरेंसारख नेतृत्व आवश्यक आहे असे उद्गार श्री. प्रभू यांनी काढले.
रत्नागिरी येथील वीर सावरकर सभागृहात या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक रवींद्र सामंत, एयर मार्शल हेमंत भागवत, इंद्रजीत देशमुख, सुरेश प्रभू यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्रातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर लिखीत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवनावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी मुखपृष्ठ बनविणाऱ्या हर्षला प्रभू देसाई यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे, भगवान सांबरे, सौ. भावना सांबरे, उद्योजक रवींद्र सामंत, इंद्रजीत देशमुख, सौ. उमा प्रभू, हेमंत भागवत, लेखक ॲड. नकुल पार्सेकर, कोकणसादचे संपादक-संचालक संजय ढवळीकर, संपादक सागर चव्हाण, राहुल गडपाले, सिंधुदुर्गचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सुशीलकुमार मुळे, राजेंद्र केसरकर, विनोद राऊळ, उद्योजक डॉ . संतोष राणे, मोहन होडावडेकर, प्रा. रूपेश पाटील, यशस्वी युवा उद्योजक बाबा टोपले, प्रचिती देशपांडे, प्रवीण पाटील, धीरज सांबरे, बाळकृष्ण लिंगवत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दरम्यान, संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, जिजाऊच्या मोफत प्रशिक्षण केंद्रातून अनेक शासकीय अधिकारी घडलेत. पालघर, ठाणे अन् रत्नागिरीत श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सेवा देत आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात संस्थेच कार्यरत असून या कोकणातून आयएएस, आयपीएस अधिकारी घडवण्याचं माझं स्वप्न आहे. आरोग्यासाठी लोकांना दागिने गहाण ठेवण्याची, शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ गोरगरीबांवर येऊ नये, हा माझा उद्देश आहे, असे उद्गार त्यांनी काढले. समाजाचं देणं लागतो या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. आई-वडीलांनी दिलेले संस्कार घेऊन आम्ही कार्यरत आहोत. दिनदुबळ्याच्या दुःखासाठी आम्ही कार्य करत आहोत. कोकणातील पाचही जिल्ह्यात आम्ही कार्यरत आहोत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शेकडोंच्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.



