वेग, नेमबाजी आणि जिद्दीची रोमांचक कसोटी!, सिंधुदुर्गच्या पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; भोसले सैनिक स्कूलच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्रीडा कौशल्याला मिळाले व्यासपीठ.

सावंतवाडी : जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहित सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या अनोख्या स्पर्धेत सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत वाढवली.

रनिंग, सायकलिंग आणि रायफल शूटिंग या तीन आव्हानात्मक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांच्या वेग, सहनशक्ती, एकाग्रता आणि अचूकतेची खरी कसोटी लागली. तिन्ही प्रकारांतील एकत्रित कामगिरीच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. विविध वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेमुळे बालक्रीडापटूंना आपल्या सर्वांगीण क्रीडा क्षमतेचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

विजेत्यांची कामगिरी

८ ते १० वर्षे मुली गट :

  • प्रथम : स्पृहा भूषण नार्वेकर
  • द्वितीय : काव्या अर्जुन राऊळ
  • तृतीय : अमारा बिर्ला

८ ते १० वर्षे मुले गट :

  • प्रथम : अंश राजेश राऊळ
  • द्वितीय : आराध्य राजन गोवेकर
  • तृतीय : अधृत स्नेहल गावेकर

११ ते १४ वर्षे मुली गट :

  • प्रथम : मैथिली सचिन गावडे
  • द्वितीय : आस्था अमित लिंगवत
  • तृतीय : सौम्या दत्ताराम मेस्त्री

११ ते १४ वर्षे मुले गट :

  • प्रथम : करण आनंद गवळी
  • द्वितीय : दत्ताराम प्रवीण गवस
  • तृतीय : रुद्रवीर आदर्श सैनी

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भोसले नॉलेज सिटीचे सीईओ तथा भोसले सैनिक स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.) आणि यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत शिस्त, नियमित सराव आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भोसले नॉलेज सिटीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सिंधुदुर्गातील या पहिल्याच ज्युनिअर ट्रायथलॉन स्पर्धेने क्रीडा क्षेत्रातील नव्या संधींचे दालन खुले केले असून भविष्यात अशा स्पर्धांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles