मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटलेली असताना आणि भाजपने सुहास शिरसाट यांना अधिकृत उमेदवारी दिली असतानाही, शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
या बंडखोरीनंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि तिखट शब्दांत आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर, महायुतीमधील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी तातडीने पावले उचलली आहेत.
भाजपविरोधात मनात साचलेली खदखद बोलून दाखवल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्तारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत आणि सत्तारांच्या नाराजीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.



