वैभववाडी : जिद्द, शिस्त, परिश्रम आणि राष्ट्रसेवेची भावना यांची सांगड घातल्यास यश निश्चित मिळते, याचा प्रत्यय वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन एनसीसी कॅडेट्सनी आणून दिला आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या बॅच २०२३-२४ मधील अक्षय मोपेरकर आणि विठ्ठल संजय गुरव या दोन कॅडेट्सची मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ मध्ये निवड झाली असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उंबर्डे येथील अक्षय मोपेरकर (बी.एस्सी.) आणि कोते-राधानगरी येथील विठ्ठल संजय गुरव (बी.ए.) यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामागे एनसीसीमधून मिळालेली शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही कॅडेट्सकडे एनसीसीचे प्रतिष्ठित “सी” प्रमाणपत्र असल्याने त्यांना भरती प्रक्रियेत अतिरिक्त पाच बोनस गुण मिळाले. या गुणांमुळे अंतिम गुणवत्ता यादीत त्यांना मोठा फायदा झाला आणि मुंबई पोलिस दलात प्रवेशाचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

एनसीसी हे केवळ प्रशिक्षण देणारे व्यासपीठ नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी जीवनशाळा आहे. शिस्त, संघभावना, नेतृत्व, देशभक्ती आणि संकटांना सामोरे जाण्याची तयारी हे गुण एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये रुजतात. त्यामुळे सैन्य, पोलीस आणि विविध शासकीय सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी एनसीसी हे एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या यशामागे 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे दर्जेदार प्रशिक्षण तसेच प्राध्यापक आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कॅडेट्सच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या यशामुळे एनसीसीच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. अक्षय आणि विठ्ठल यांच्या यशोगाथेने अनेक युवकांच्या मनात नवे ध्येय, नवी उमेद आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण केली आहे.



