सावंतवाडी : ठाणे, मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बुद्धिबळपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. यामध्ये सावंतवाडी येथील मुक्ताई अकॅडमीचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ४९८ स्पर्धकांमध्ये ७३ वा क्रमांक पटकावत रोख पारितोषिक मिळवून विशेष लक्ष वेधून घेतले.
विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे आणि ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून सुमारे ४९८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये तब्बल ३१४ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू सहभागी झाल्याने स्पर्धेचा दर्जा अत्यंत उच्च होता.
बाळकृष्ण पेडणेकर याने नऊ फेऱ्यांपैकी पाच सामने जिंकत आणि दोन सामने बरोबरीत सोडवत सहा गुणांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने ७३ वा क्रमांक मिळवत रोख पारितोषिकावरही आपले नाव कोरले.
या स्पर्धेत मालवण येथील मयुरेश परुळेकर आणि मयुरेश मालवणकर यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, दृक्बाधित बुद्धिबळपटू मयुरेश परुळेकर याने नऊ फेऱ्यांमध्ये चार विजय आणि एक बरोबरीसह साडेचार गुण मिळवले. त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल २७ गुणांची वाढ झाली, ही त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीची पावती मानली जात आहे.
मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी हे यश संपादन केले. अकॅडमीच्या उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे सिंधुदुर्गच्या बुद्धिबळ क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, बाळकृष्ण पेडणेकर व इतर खेळाडूंवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



