सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना अखेर गती मिळाली असून कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या प्रलंबित होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ८ जून रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीस जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नव्याने रुजू झालेले शिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर यांच्यासमोर शिक्षकांच्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रस्तावांची यादी सादर करण्यात आली. त्यानुसार काही प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात आली.
यामध्ये सौ. संध्या पंढरी मुणगेकर (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) यांना पर्यवेक्षक पदाची मान्यता, राजाराम संभाजी तोरस्कर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ), वैभव पांडुरंग कोंडस्कर (कुडाळ हायस्कूल) आणि विनोद शिवाजी चौगुले (शिरगाव हायस्कूल, देवगड) यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच श्री. दत्त नारायण प्रभू खानोलकर (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) यांना वैयक्तिक मान्यता, शर्वरी चंद्रकांत जाधव (महात्मा गांधी विद्यामंदिर, सातार्डे) यांच्या अनुकंपा नियुक्तीस मान्यता देण्यात आली. श्रद्धा नितीन पराडकर (न्यू इंग्लिश स्कूल, कलबिस्त) यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावालाही मंजुरी मिळाली. याशिवाय अरविंदराव राणे विद्यालय, वैभववाडीच्या रोस्टर तपासणीसाठी शिफारसपत्र स्वीकारण्यात आले.
उर्वरित शिक्षकांच्या समस्या देखील लवकरात लवकर सोडविण्यात येतील, तसेच जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर यांनी यावेळी दिले.
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी नव्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत, “सिंधुदुर्गला सक्षम आणि संवेदनशील अधिकारी लाभले असून शिक्षकांचे प्रश्न आता निश्चितपणे मार्गी लागतील,” असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीस मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव घावरे, उपाध्यक्ष रवींद्र सावंत, मार्गदर्शक गुरुदास कुसगावकर, सुभाष खरात, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, शरद चोडणकर, सुरेश चौकेकर, स्वाती वालावलकर, आप्पा लांबोरे, सतीश तवटे, राजेश पाटकर, राहुल कदम, विजया सावंत, योगेश चव्हाण, सत्यवान परब, साईप्रसाद वेंगुर्लेकर, रमेश कविटकर, चैतन्य सुकी, शकलेन पटेल, राजाराम तोरस्कर, दिवाकर पवार, विनोद चौगुले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“समस्या गंभीर असतील, तर उपायासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे खंबीरपणे उभे राहतात,” याची पुन्हा एकदा प्रचिती या बैठकीत आल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


