चक्क मध्यरात्री FIR दाखल, मडुरा स्ट्रीट लाईट प्रकरणात प्रशासनाला जाग! ; जखमी सागर केरकरला न्याय मिळवून देण्यासाठी मनसेची आक्रमक भूमिका, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी.

सावंतवाडी : मडुरा येथील स्ट्रीट लाईटचा बल्ब बदलण्यासाठी थेट खांबावर चढविण्यात आलेल्या सागर केरकर यांच्या व्हिडिओने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असतानाच, या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेत आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या हस्तक्षेपानंतर अखेर काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.

या घटनेत जखमी झालेल्या सागर केरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बांदा पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. ही बाब समोर येताच मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने मडुरा येथे भेट देऊन केरकर दाम्पत्याशी संवाद साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

यानंतर मनसेचे पदाधिकारी, जखमी सागर केरकर आणि गंगाराम केरकर यांच्यासह थेट बांदा पोलिस ठाण्यात दाखल झाले. मनसेच्या पाठपुराव्यानंतर तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला.

यावेळी या गंभीर प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी मनसेने केली. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला पाठीशी घालणाऱ्यांना माफी नसल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, तालुका उपाध्यक्ष सुनील आसवेकर, तालुका सचिव सतीश आकेरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

“व्हिडिओ व्हायरल, मनसे मैदानात आणि मध्यरात्री FIR!”

मडुरा येथील या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles