घारपी येथे गोकृपा अमृतम निर्मितीचा विक्रम! ; एका दिवसात तब्बल १०,८०० लिटर उत्पादन. नैसर्गिक शेतीच्या दिशेने शेतकऱ्यांचे प्रेरणादायी पाऊल. ; दशपर्णी अर्क व बीजप्रक्रियेचेही प्रात्यक्षिक.

सावंतवाडी : नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब यासाठी घारपी येथील शेतकऱ्यांनी एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश शेतकरी गट आणि एकता शेतकरी गटाच्या सदस्यांनी एकत्रितपणे केवळ एका दिवसात तब्बल १० हजार ८०० लिटर गोकृपा अमृतम तयार करून उल्लेखनीय यश संपादन केले.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी ड्रममध्ये गोकृपा अमृतम तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच नैसर्गिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त असलेल्या दशपर्णी अर्क निर्मिती व बीजप्रक्रिया तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रात्यक्षिकही करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या विविध तंत्रांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

सदर उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांचा पुरवठा कोकणश्री ग्राम शेतकरी कंपनी यांनी केला. काळा गूळ, ताक यांसारख्या साहित्याचा वापर करून नैसर्गिक शेतीसाठी उपयुक्त घटक तयार करण्यात आले.

कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. गोरे, मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर, उपकृषी अधिकारी मनाली परब, बीटीएम मीनल परब तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करत नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे, सेंद्रिय गट व पाणी फाउंडेशनच्या गटशेती संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे सामूहिक श्रम, नियोजन आणि नैसर्गिक शेतीविषयीची बांधिलकी अधोरेखित झाली. गोकृपा अमृतमबरोबरच मोठ्या प्रमाणात दशपर्णी अर्काची निर्मिती करून घारपी येथील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या चळवळीला नवी ऊर्जा दिली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles