आजगाव ड्रोन सर्वेक्षण वादावर संजू परबांची यशस्वी मध्यस्थी! ; तणावाच्या वातावरणात साधला ‘सुवर्णमध्य’. ; मनीष दळवींच्या भूमिकेवर ग्रामस्थ आक्रमक, वैभव नाईक, रूपेश राऊळ, सुदन कवठणकरांनीही घेतली धाव.

सावंतवाडी : आजगाव व दशक्रोशी परिसरात प्रस्तावित मायनिंगसंदर्भातील ड्रोन सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी वातावरण चांगलेच तापले. जेएसडब्ल्यू कंपनीच्या सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी जाब विचारत वेतोबा मंदिर परिसरात आणल्यानंतर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. संतप्त ग्रामस्थ, सर्वेक्षण कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वाढता संघर्ष पाहता परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

अशा वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची सूत्रे हाती घेतली. आक्रमक भावना व्यक्त करणाऱ्या ग्रामस्थांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेताना त्यांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली. याचबरोबर पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत संवादाचा मार्ग खुला केला.

स्थानिक ग्रामस्थ तथा कायदेतज्ज्ञ ॲड. स्वप्निल प्रभू आजगावकर यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या भावना आणि शंका वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्यात आल्या. यावेळी आमदार दीपक केसरकर तसेच आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरणातही संवादाचे पूल बांधले गेले आणि संघर्षाऐवजी समन्वयाचा मार्ग स्वीकारला गेला.

दरम्यान, या प्रकरणात जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील एका प्रभावशाली नेत्याचे नाव ग्रामस्थांकडून घेतले जात असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मायनिंग संदर्भातील या घडामोडींमध्ये संबंधित नेत्याची भूमिका नेमकी काय आहे, याबाबतही ग्रामस्थांमध्ये उत्सुकता व्यक्त होत आहे. मात्र वाढत्या तणावाच्या वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात संजू परब यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

ग्रामस्थांच्या भावना, प्रशासनाची जबाबदारी आणि कायदा-सुव्यवस्थेची गरज यांचा समतोल राखत संजू परब यांनी साधलेला ‘सुवर्णमध्य’ हा आजच्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे संभाव्य संघर्ष टळला आणि संवादातून मार्ग काढण्याचा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला.

यावेळी उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, संजय गावडे, ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, आजगाव येथील कायदेतज्ज्ञ ॲड. स्वप्नील प्रभू आजगावकर, आजगाव माजी सरपंच रामचंद्र झांट्ये, सागर नाणोसकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सामाजिक कार्यकर्ते अमित प्रभू, सचिन प्रभू, दत्तप्रसाद प्रभू, श्री. नातू, प्रशांत काकतकर, आसोली सरपंच बाळा जाधव, माजी उपसरपंच विकी केरकर, मदन गावडे, सुनील गावडे, चंद्रकांत कासार, संतोष चव्हाण, राजेश आजगावकर, नील प्रभूझांट्ये, संकेत धुरी, राकेश धुरी, प्रवीण किनळेकर यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आजगाव-दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles