महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या निवडणुकीत ‘एकता पॅनेल’चा झंझावाती विजय!, सिंधुदुर्गात सर्व ९ जागांवर दणदणीत यश! ; विरोधकांचा सुपडा साफ.

सावंवाडी: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या द्विवार्षिक निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘एकता पॅनेल’ने अभूतपूर्व यश संपादन करत सर्वच्या सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि उद्योजक क्षेत्रात एकता पॅनेलच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटली आहे.

चेंबरच्या फोर्ट, मुंबई येथील मुख्य कार्यालयात १५ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी प्रत्यक्ष निवडणूक केवळ नाशिक आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत झाली. त्यामुळे सिंधुदुर्गातील उद्योग व व्यापारी क्षेत्राचे या निकालाकडे विशेष लक्ष लागून राहिले होते.

चेंबरचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष रविंद्र माणगावे तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष व कोकणचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकता पॅनेलने एकूण नऊ जागांसाठी निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या या पॅनेलच्या विजयावर अखेर मतदारांनीही शिक्कामोर्तब केले.

एकता पॅनेलला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ तसेच कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा जाहीर पाठिंबा लाभला होता. या पाठिंब्याचे रूपांतर विक्रमी मताधिक्यात झाले.

कोकण विभागीय अध्यक्षपदासाठी संतोष राणे यांनी १८६ मते मिळवत विजय संपादन केला. मुंबई-कोकण विभागातील वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी सुधाकर शेट्टी यांनी तब्बल ८५४ मते मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.

सिंधुदुर्ग जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलसाठी राजन नाईक (१७३), अॅड. नकुल पार्सेकर (१६४), मनोज वालावलकर (१५८), विजय केनवडेकर (१४६), मिलिंद प्रभू (१४२), विशाल कामत (१४१) आणि कुणाल वरसकर (१३९) यांनी विजय मिळवला.

विरोधी प्रगती पॅनेलला मात्र मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याचे निकालातून दिसून आले. उपाध्यक्षपदाचे उमेदवार भालचंद्र राऊत यांना केवळ ६६ मते मिळाली. तर अन्वेषा आचरेकर (७७), गंगाराम पै (८४), अशोक सारंग (८४), भालचंद्र सामंत (८१), राजेंद्र गावकर (६०), रामचंद्र घोगळे (५०) आणि उत्तम सराफदार (३७) यांना पराभव स्वीकारावा लागला.

या विजयाबद्दल चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, सचिव राजू जठार, सामाजिक कार्यकर्ते रणजित देसाई तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

एकता पॅनेलच्या वतीने सर्व सुज्ञ मतदारांचे आभार व्यक्त करण्यात आले असून, उद्योग-व्यापार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles