सावंतवाडी : “योगामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. योग ही आपल्या भारताच्या ऋषीमुनींनी जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज संपूर्ण जगाने योगाचे महत्त्व स्वीकारले असून प्रत्येकाने निरोगी आरोग्यासाठी दररोज योगसाधना करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन योग शिक्षिका रोहिणी बांदेकर यांनी केले.

अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्र. १५ आणि कै. सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाचे विविध प्रकार सादर केले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शिक्षिका भावना गावडे, पूजा ठाकूर, रणजीत सावंत, हेमांगी जाधव आणि प्राची ढवळ यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध आसनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांनीही चिमुरड्यांना योगसाधना सुलभतेने करता यावी यासाठी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमात राहील शेख, पूजा शिर्के, अद्विक पाटील, वेदा जाधव, प्राप्ती गवळी, श्री नेवगी, सार्थक नेवगी, स्निग्धा प्रभू, इशिता कडगावकर आणि चिन्मय कालेलकर या चिमुरड्यांसह इतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
लहान वयातच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजाव्यात, योगाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीचा पाया मजबूत व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.



