कुडाळ : लहान वयातच मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देत क्रीडा संस्कारांची भक्कम पायाभरणी करण्याच्या उद्देशाने सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे आयोजित केलेल्या कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुडाळ, कणकवली आणि परिसरातील पाच वर्षांवरील तब्बल १२४ विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आणि कॅरम तसेच बुद्धिबळाच्या प्राथमिक तंत्रांचे प्रशिक्षण घेतले.
मराठा समाज हॉल येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, रामचंद्र परब, संवाद मीडिया न्यूजच्या ब्युरो चीफ विभावरी पालव, सीए श्री. वालावलकर, केंद्रप्रमुख श्री. वारंग, पत्रकार निलेश जोशी, उन्मेष शेट्ये, गुरुप्रसाद सावंत, अनंत राणे, आगलावे तसेच बुद्धिबळ मार्गदर्शक मयुरेश मालवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्याने दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात कौस्तुभ पेडणेकर यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या दहा वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, ॲकेडमीचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवत असून तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ रेटिंग मिळवले आहे. सलग तीन वर्षे ‘बेस्ट ॲकेडमी’ हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार मिळवणारी कोकणातील ही एकमेव संस्था असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना काका कुडाळकर यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या कार्याचे भरभरून कौतुक करत, “मुलांच्या खेळातील आवड ओळखून त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुक्ताई ॲकेडमीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावरील कॅरम चॅम्पियन आणि जागतिक दर्जाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर घडवावेत,” अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ॲकेडमीला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक स्व. सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांनी तब्बल २७ वर्षे कॅरम खेळासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या कार्याचा वारसा आज कौस्तुभ आणि बाळकृष्ण पेडणेकर समर्थपणे पुढे नेत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात मुक्ताई ॲकेडमीचे विद्यार्थी बाळकृष्ण पेडणेकर आणि मयुरेश मालवणकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोसिएशनचे राज्य पंच (State Arbiter) म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. काका कुडाळकर यांच्या हस्ते मयुरेश मालवणकर यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम खेळातील बारकावे, तर मयुरेश मालवणकर यांनी बुद्धिबळाच्या प्राथमिक तंत्रांचे सविस्तर प्रशिक्षण दिले. तसेच विविध स्पर्धा, गुणांकन पद्धती, खेळातून मिळणाऱ्या संधी आणि करिअरच्या वाटा याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समीर राऊळ यांनी केले.
बुद्धीला धार, खेळाला संस्कार आणि भविष्यातील विजेते घडविण्याचा ध्यास घेणाऱ्या मुक्ताई ॲकेडमीच्या या उपक्रमाने सिंधुदुर्गातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



