सावंतवाडी : श्री वासुदेवानंद सरस्वती (एकमुखी दत्त) मंदिर, न्यू सबनीसवाडा, सावंतवाडी येथे बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.
उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजता एकमुखी दत्तपूजा, एकादशी व लघुरुद्र, ९ वाजता श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरती, ७.३० वाजता श्री टेंबे स्वामी पालखी सोहळा आणि रात्री ८.३० वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
मंदिरात दररोज सायंकाळी ७ वाजता नामस्मरण व आरती होत असल्याची माहितीही व्यवस्थापन समितीने दिली आहे. महाप्रसादासाठी धान्य स्वरूपात शिधा देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी १३ जुलै २०२६ पर्यंत मंदिरात शिधा जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



