सावंतवाडी : “जिथे प्रशासन थांबले, तिथे जनतेच्या जिद्दीने मार्ग काढला!” या उक्तीचा प्रत्यय न्हावेली-रेडी महामार्गावरील चौकेकरवाडी येथे आला आहे. अनेक वर्षांपासून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या आणि वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या धोकादायक ठिकाणी अखेर साईड पट्टी व संरक्षक भिंतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. न्हावेलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांच्या सातत्यपूर्ण व आक्रमक पाठपुराव्याला आणि ग्रामस्थांच्या एकजुटीला अखेर यश मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला न्हावेली-रेडी मार्ग चौकेकरवाडी परिसरात अनेक वर्षांपासून धोक्याचा बनला होता. रस्त्यालगत साईड पट्टी आणि संरक्षक भिंत नसल्याने प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत होता. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले पत्र्याचे बॅरेल्स वाहतुकीसाठी अडथळा ठरत होते. पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी आणि शेजारी असलेली खोल दरी यामुळे वाहनचालकांना मार्गाचा अंदाजच येत नव्हता. परिणामी येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत होते.
या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अक्षय पार्सेकर यांनी सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित आणि निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गावडे यांच्यासह थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयात धडक दिली. कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासमोर विविध रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा ठामपणे मांडत संबंधित काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आग्रही मागणीही करण्यात आली.
या ठाम भूमिकेची दखल घेत कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले. त्यानुसार उपअभियंता अजित पाटील आणि कनिष्ठ अभियंता विजय लोहार यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाला गती दिली. उपअभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणच्या मुख्य पुलालाही शासनाची मंजुरी मिळाली असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा वेगाने सुरू आहे.
यावेळी बोलताना अक्षय पार्सेकर म्हणाले, “न्हावेली-रेडी मार्गावरील ही समस्या केवळ रस्त्याची नव्हती, तर ती नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित होती. ग्रामस्थांच्या साथीने आम्ही सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हे यश संपूर्ण न्हावेली ग्रामस्थांचे असून विकासासाठी आमचा संघर्ष यापुढेही असाच सुरू राहील.”
कामाच्या शुभारंभप्रसंगी अक्षय पार्सेकर यांच्यासह अमोल पार्सेकर, ओम पार्सेकर, सौरभ पार्सेकर, दीपक पार्सेकर, अनिकेत धवण, रोहित निर्गुण, प्रथमेश अरोंदेकर, राज धवण यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆ उपशीर्षक :
**“जनतेच्या एकजुटीसमोर दिरंगाई नमली; धोकादायक वळण आता सुरक्षिततेच्या दिशेने!”



