पणजी : हिंदू धर्मगुरु जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओल्ड गोवा येथील श्री गोवेश्वर मंदिरात ११५ कुटुंबियांचा विधिवत व शास्त्रशुद्ध पद्धतीने हिंदू धर्मात पुनःप्रवेश (घरवापसी) सोहळा पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी म्हणाले, “जे मूळचे हिंदू होते आणि काही अपरिहार्य कारणांमुळे धर्मांतर झाले, अशा व्यक्तींना पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी करता येते. मात्र पुन्हा धर्मत्यागाचा मार्ग स्वीकारू नका. तुमच्या जीवनातील समस्या भक्तीच्या मार्गाने सोडविण्यासाठी हिंदू धर्मगुरु म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन.”
ते पुढे म्हणाले की, “यापुढे कोणतेही संकट आले तरी धर्मगुरु म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. दर तीन महिन्यांनी माझे गोवा उपपीठावर आगमन होत असते. त्यामुळे मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. तुमचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांनी हिंदू धर्मानुसार जीवनाचा प्रवास पूर्ण केला. आता तुम्हीही पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करत असल्याने पुढील सर्व धार्मिक विधी व संस्कार हिंदू धर्माच्या परंपरेनुसारच करावेत.”
या घरवापसी सोहळ्यात ११५ कुटुंबियांनी विधिवत हिंदू धर्मात पुनःप्रवेश केला. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि शास्त्रशुद्ध प्रक्रियेद्वारे हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक व श्रद्धाळू उपस्थित होते.



