स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आनंद धोंड तर सचिवपदी साबाजी परब ; पत्रकारांच्या न्याय-हक्कांसाठी संघटना खंबीरपणे उभी राहणार, आवश्यक असल्यास न्यायालयीन लढाही लढू! : जिल्हाध्यक्ष आनंद धोंड.

सिंधुदुर्गनगरी : पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक तथा गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेले आनंद धोंड यांची जिल्हाध्यक्षपदी, तर सत्यार्थ महाराष्ट्रच्या माध्यमातून कोकणातील जनसामान्यांचा बुलंद आवाज बनलेले व्हिडिओ एडिटर साबाजी (बंटी) परब यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीची घोषणा स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष, अभ्यासू पत्रकार, संपादक तथा विविध पत्रकार संघटनांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रा. रूपेश पाटील यांनी केली.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आनंद धोंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील पत्रकारांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे अन्याय, शासकीय स्तरावरील अडचणी आणि पत्रकार संरक्षणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्य करणार आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यासही संघटना मागे हटणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यासाठी लवकरच जिल्हास्तरीय कार्यकारिणीचा विस्तार करून तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार असून, संघटनेला अधिक सक्षम व गतिमान बनविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण (अण्णा) नेरकर आणि महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या विविध जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी नूतन कार्यकारिणीचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केले आहेत.

पत्रकारितेची प्रतिष्ठा अबाधित राखत पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला असून, या निवडीबद्दल विविध स्तरांतून आनंद धोंड आणि साबाजी (बंटी) परब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles