सावंतवाडी : सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या १५ वर्षांपासून सावंतवाडी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्र्यांचे वितरण केले जाते. यंदाही प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावर्षी कोलगाव केंद्र शाळा क्र. १, ओटवणे केंद्र शाळा क्र. १, सावंतवाडी शहर शाळा क्र. ४, दाणोली येथील बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय, ओटवणे रवळनाथ माध्यमिक विद्यालय, मळगाव इंग्लिश स्कूल, माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय तसेच सावंतवाडी वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांनी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे कौतुक करून आभार व्यक्त केले.



