महसूल विभागाच्या कलम १५५ प्रकरणात मोठा घोटाळा? ; सिंधुदुर्गातील तीन तहसील कार्यालयांतील कथित गैरव्यवहाराची मंत्रालयीन स्तरावरून चौकशी समितीद्वारा व्हावी चौकशी. ; महसूल मंत्र्यांकडे माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांचा तक्रार अर्ज दाखल.

सावंतवाडी : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १५५ अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर कथित अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार आणि कर्तव्यात कसूर झाल्याचा गंभीर आरोप करत माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल रुपाजी चौगुले यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तक्रार अर्जानुसार, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तीन तहसील कार्यालयांमध्ये सन २०२० ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५५ अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची तसेच अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून महसूल प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे.

तक्रारीत संबंधित तहसीलदारांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, २०२० ते २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या सर्व कलम १५५ च्या प्रकरणांचा तपशील मागवावा, प्रकरणे निकाली काढण्यास झालेल्या विलंबाची कारणे तपासावीत आणि कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच चौकशी समितीमार्फत सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशीही मागणी अर्जात करण्यात आली आहे.

हा तक्रार अर्ज १७ जुलै २०२६ रोजी महसूल मंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून, या गंभीर आरोपांमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. आता या तक्रारीवर शासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles