नांदेड : जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२) यांनी आज (शुक्रवारी) सकाळी आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह कार थेट गोदावरी नदीत घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत त्यांची मुलगी सारा (वय १३) आणि मुलगा सुमीत (वय १०) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ते आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आपली बलेनो कार (एमएच-२६-सीई-४५८२) पुणेगाव येथील गोदावरी नदीवरील पुलावर नेली आणि सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास कार थेट नदीपात्रात घातली.
या घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच सोशल मीडियावर संदेश पोस्ट करून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित छळाचा उल्लेख केला होता. या संदेशांमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
गोदावरी नदीत कार झोकून जीवन संपवलं –
भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असलेले सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंब नांदेड शहराजवळील कोकाटेसांगवी (विमानतळ परिसर) येथे वास्तव्यास होते.
आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲपवर संदेश –
घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी “माझी शाळा भानेगाव” या व्हॉट्सअॅप समूहावर संदेश पाठवून आपण मुलांसह आत्महत्या करणार असल्याचे नमूद केले होते. तसेच सोशल मीडियावरील स्टेटसमध्येही त्यांनी काही वरिष्ठांच्या कथित छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा दावा केला होता.
या संदेशांमध्ये त्यांनी शिक्षण विभागातील काही आजी-माजी अधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संदेश पाहिल्यानंतर सहकारी आणि परिचितांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ही दुर्घटना घडली होती. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित दाव्यांची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जात आहे.
एनडीआरएफच्या मदतीने कार बाहेर –
सकाळी अंदुरा परिसरातील नदीपात्रात कार बुडाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर जिल्हा पोलीस, एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीमेनंतर नदीतून कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही भावूक झाले.



