सावंतवाडी : मळगाव मेटा येथे शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास चालत्या दुचाकीसमोर अचानक माकड आडवे आल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अजित खडपकर (वय ४६) हे गंभीर जखमी झाले.
अपघातात अजित खडपकर यांच्या तोंडाला तसेच हात व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी घटनास्थळावरून जात असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य तथा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी प्रसंगावधान राखत जखमीला तातडीने स्वतःच्या वाहनातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती दिली.
उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ओमकार कोल्हे व डॉ. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जखमीवर उपचार सुरू आहेत.
यावेळी जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच रवी जाधव यांनीही मदतकार्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. दीपक गवस यांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.



