✍️ रूपेश पाटील .
राजकारणात यश मिळविण्यासाठी घराण्याचा वारसा, संपत्तीची ताकद किंवा सत्तेची शिडी आवश्यक असते, असा सर्वसामान्य समज आहे. परंतु काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने हे सारे समज खोटे ठरवतात. संघर्षाला सोबती, जनतेच्या विश्वासाला भांडवल आणि सेवाभावाला जीवनमंत्र मानत स्वतःचा इतिहास घडविणारे नाव म्हणजे माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर.


कोकणच्या लाल मातीत रुजलेले हे व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातील विश्वास, संयम, अभ्यासू नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे प्रतीक बनले आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदापासून महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ एका राजकारण्याचा प्रवास नसून, सामान्य माणसाच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या जिद्दीचा, धैर्याचा आणि अविरत परिश्रमाचा प्रेरणादायी इतिहास आहे.


समाजसेवेचा संस्कार त्यांना वडील वसंतशेठ केसरकर यांच्या कार्यातून लाभला. जनतेचे अश्रू पुसणे, अडचणीत धावून जाणे आणि समाजासाठी स्वतःला वाहून घेणे हा वारसा त्यांनी केवळ स्वीकारला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेने १९९२ मध्ये राजकारणात प्रवेश करताना त्यांच्या हातात सत्ता नव्हती, पण जनतेचा विश्वास होता; पद नव्हते, पण काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती, आणि हाच विश्वास त्यांच्या यशाचा पाया ठरला.

स्वीकृत नगरसेवक म्हणून सुरू झालेली वाटचाल सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचली. शहराच्या विकासाला नवे आयाम देताना त्यांनी विकास म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीट नव्हे, तर लोकांच्या जीवनात सुख, सुविधा आणि समाधान निर्माण करणे असते, हे दाखवून दिले. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या विकासकामांनी त्यांना जनतेच्या मनात कायमचे स्थान मिळवून दिले.
सन २००९ मध्ये सावंतवाडीच्या जनतेने त्यांच्यावर आमदार म्हणून विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचे त्यांनी विकासाच्या माध्यमातून सोनं केले. सलग चार वेळा विधानसभा गाठत त्यांनी इतिहास घडविला. हा केवळ निवडणूक जिंकण्याचा चौकार नव्हे, तर जनतेच्या प्रेमाची, विश्वासाची आणि कार्यकर्तृत्वाच्या स्वीकाराची सुवर्णमय विजयश्री होती.


राजकारणातील सर्वात कठीण आणि वादळी काळातही दीपकभाईंनी संयमाचा दीप विझू दिला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय घडामोडींमध्ये प्रवक्त्याच्या भूमिकेत त्यांनी शांत, संतुलित आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. वादळ कितीही मोठे असले तरी दीपस्तंभ जसा जहाजांना दिशा दाखवत राहतो, तसेच त्यांनी त्या काळात आपल्या नेतृत्वगुणांची वेगळी ओळख निर्माण केली.
कॅबिनेट मंत्री म्हणून शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी शिक्षणाला केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यापासून ते त्यांच्या मनावरील ताण हलका करण्यापर्यंत, मोफत गणवेशापासून बूट-पायमोज्यांपर्यंत, पोषण आहारापासून परसबागांपर्यंत, आजी-आजोबा दिवसापासून सुंदर शाळांपर्यंत, शिक्षकांच्या सन्मानापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीपर्यंत – अशा असंख्य निर्णयांनी त्यांनी शिक्षणव्यवस्थेला नवसंजीवनी दिली.
त्यांच्या कार्यकाळात शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन न राहता संस्कार, गुणवत्ता, आनंद आणि भविष्य घडविण्याचे माध्यम बनले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना दिशा देणारा आणि शिक्षकांच्या हातातील खडूला नव्या आशेचे बळ देणारा शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा श्वास आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच मराठी भाषेचा जागतिक विस्तार व्हावा, परदेशातील मराठी बांधव एकत्र यावेत आणि नव्या पिढीला आपल्या भाषेचा अभिमान वाटावा, यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम उल्लेखनीय ठरले आहेत. जपानसारख्या देशांमध्ये मराठी संस्कृतीचा दीप प्रज्वलित करण्याचा त्यांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
राज्याच्या अर्थकारणातही त्यांनी अभ्यासू मंत्री म्हणून वेगळी छाप पाडली. अर्थराज्यमंत्री म्हणून अनेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आकड्यांमागील समाजकारण समजून घेतले. विकास, नियोजन आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम त्यांच्या आर्थिक विचारांत दिसून येतो.
राजकीय प्रवास !
1996 : पहिल्यांदा सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान
2009 : महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून येत ‘आमदार’.
2014: महाराष्ट्र विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून आले.
2014: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अर्थ, ग्रामीण विकास ‘राज्यमंत्री’.
2014 : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘पालकमंत्री’.
2019 : महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून येत विजयी ‘हॅट्रिक’!
2022 : राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या प्रवक्ते पदी निवड.
2022 – राज्य सरकारमध्ये ‘कॅबिनेट मंत्री’.
2024 – चौथ्यांदा आमदार.
कोकण हा केवळ निसर्गाचा नव्हे, तर संधींचाही खजिना आहे, या विश्वासातून त्यांनी पर्यटन विकासाला चालना दिली. ‘रत्नसिंधू’सारख्या संकल्पनांमधून कोकणच्या विकासाला नवी दिशा दिली. त्याचबरोबर राज्यातील लाखो तरुणांना जर्मनीसारख्या देशांत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून केलेले प्रयत्न त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात.
मात्र दीपकभाईंची खरी ओळख त्यांच्या पदात नाही; ती त्यांच्या माणुसकीत आहे. संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी धावून जाणारा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणारा, सामाजिक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि प्रसिद्धीचा गाजावाजा न करता असंख्य गरजूंना आधार देणारा हा लोकनेता जनतेच्या मनात घर करून आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारण्याची दूरदृष्टी आहे, समाजसेवकाची करुणा आहे, प्रशासकाची शिस्त आहे, कार्यकर्त्याची धडपड आहे आणि संतवृत्तीचा संयम आहे. साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” या विचारांचा स्वीकार करून त्यांनी सार्वजनिक जीवनात संयम, सहिष्णुता आणि सकारात्मकतेचा आदर्श घालून दिला आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागे वळून पाहताना जाणवते की, त्यांनी केवळ पदे भूषविली नाहीत; तर प्रत्येक पदाला लोकहिताचा अर्थ दिला. त्यांनी केवळ योजना राबविल्या नाहीत; तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण पेटविला. त्यांनी केवळ राजकारण केले नाही; तर जनसेवेला जीवनाचे व्रत मानले.
दीपकभाई म्हणजे विकासाच्या वाटेवर अखंड तेवत राहणारा दीप… जनतेच्या विश्वासाचा ध्रुवतारा… आणि कोकणच्या अस्मितेचा स्वाभिमानी चेहरा!
त्यांच्या आयुष्याचा हा सुवर्णप्रवास असाच यश, कीर्ती, लोकआशीर्वाद आणि जनसेवेच्या तेजाने उजळत राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्ती लाभो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोट्यवधी शुभेच्छा!



