जनतेच्या प्रेमाचा उत्सव अन् सेवाभावाच्या संकल्पाने उजळला दीप! ; आमदार दीपक केसरकरांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी दिमाखात साजरा! ; रक्तदान, वृक्षदान, शैक्षणिक साहित्य वाटपासह आरोग्यसेवेचाही संकल्प!

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : जनतेच्या विश्वासाचा दीप, विकासाचा अखंड प्रवाह आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक असलेले महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सावंतवाडी तालुका सामाजिक उपक्रमांच्या उत्सवाने उजळून निघाला. शिवसेना व दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान, वृक्षदान, शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णसेवा आणि आरोग्य जनजागृतीसारख्या विधायक उपक्रमांतून त्यांच्या वाढदिवसाला समाजसेवेचा अनोखा आयाम प्राप्त झाला.

 

संपर्क कार्यालयात अन्वेषा आणि विदिशा या चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि शुभेच्छांच्या वर्षावात कार्यालय परिसर आनंदमय झाला. दरम्यान, मुंबईतील निवासस्थानी केसरकर कुटुंबीयांनीही त्यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

युवा रक्तादाता संघटना व नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते झाला. त्यानंतर महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. अंकुर केंद्रातही हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप करून समाजोपयोगी कार्याची परंपरा जपण्यात आली.

 

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधताना आमदार दीपक केसरकर म्हणाले, “मी माझा वाढदिवस कधीच वैयक्तिक स्वरूपात साजरा करत नाही. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे खरे बळ आहे. माझे संपूर्ण जीवन जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे आणि त्यांचे प्रेम हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे.” त्यांच्या या भावनिक शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित भव्य आरोग्य शिबिराची माहिती देत, जवळपास २२ पेक्षा अधिक आरोग्य सेवा, १०० तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आणि गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आरोग्य महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सेवाभाव, समाजकारण आणि जनतेशी असलेली आत्मीय नाळ या त्रिसूत्रीचा प्रत्यय देणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांतून आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साह, आनंद आणि जनकल्याणाच्या संकल्पाने अविस्मरणीय ठरला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, अशोक दळवी, जिल्हा परिषद सदस्या सुधा कवठणकर, नगरसेवक अजय गोंदावळे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, भारती मोरे, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अनारोजीन लोबो, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, अर्चित पोकळे, तात्या वेंगुर्लेकर, विश्वास घाग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles