अखेर माडखोलच्या शेतकऱ्यांचा लढा फळाला! ; आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी प्रशासनाकडून चौकशीचे आदेश.

✍️लखन आडेलकर.

माडखोल : आंबा-काजू बागांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी माडखोल येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी २८ जुलै रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रश्नावर चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले.

माडखोल येथील शेतकऱ्यांनी आंबा-काजू पिकांच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे निवेदन सादर केले. यावेळी प्रशासनाकडून लेखी पत्र देण्यात आले. त्यामध्ये या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून नियमाधीन कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही माडखोलच्या शेतकऱ्यांनी भेट घेत निवेदन सादर केले. आंबा-काजू नुकसानभरपाईच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार डॉ. निलेश राणे आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतल्याने आंदोलनाला प्राथमिक यश मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नुकसानभरपाईबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात माडखोल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जी. जी. राऊळ, उपसरपंच भाऊ कोळमेकर, माजी सरपंच राजन राऊळ, बाळू शिरसाट, अनिल परब, संतोष राऊळ, सोसायटी संचालक आनंद राऊळ, प्रकाश नाईक, शैलेश राऊळ, हेमंत राऊळ, पांडुरंग राऊळ, बापू राऊळ, आनंद नाईक, विनेश तावडे, स्वप्निल राऊळ, प्रशांत माडखोलकर, जानू तेली, उत्तम सावंत, संतोष तेली, बंटी सावंत, आत्माराम लातये, भरत राऊळ, महेश राऊळ, दीपक राऊळ, बाबल सावंत, योगेश लाड, मनोज राऊळ यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles