शिर्डीत १४ ऑगस्ट रोजी मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबीर ; श्री साईबाबा संस्थान व माईर्स विश्वराज हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

शिर्डी : बालकांमधील जन्मजात तसेच इतर हृदयरोगांचे वेळेत निदान होऊन त्यांच्यावर योग्य व आवश्यक उपचार उपलब्ध व्हावेत, या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी आणि माईर्स विश्वराज हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी येथे मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशीषकुमार बनपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित बालहृदयरोग बाह्यरुग्ण सेवा (OPD) सुरू आहे. या सेवेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याचाच एक भाग म्हणून हे विशेष मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये बालहृदयरोग तज्ज्ञांचा मोफत वैद्यकीय सल्ला, 2D Echo तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्यांबाबत मार्गदर्शन तसेच पात्र रुग्णांसाठी मोफत बालहृदय शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जन्मजात हृदयविकार, हृदयामध्ये छिद्र, वारंवार श्वसनाचे संसर्ग होणे, खेळताना किंवा चालताना लवकर दम लागणे, हृदयाची धडधड वाढणे अथवा ठोके अनियमित जाणवणे, वजन व उंची अपेक्षेप्रमाणे न वाढणे, ओठ, जीभ किंवा नखे निळसर पडणे, हृदयाच्या झडपांचे विकार असलेल्या बालकांनी तसेच यापूर्वी हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला मिळालेल्या किंवा ओपन हार्ट सर्जरीसंदर्भात वैद्यकीय मार्गदर्शनाची आवश्यकता असलेल्या बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक बालकांना आर्थिक अडचणींमुळे हृदयविकाराचे वेळेत निदान व उपचार मिळत नाहीत. अशा बालकांचे लवकर निदान करून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
शिबिरासाठी येताना पालकांनी आपल्या मुलांचे पूर्वीचे वैद्यकीय अहवाल, 2D Echo रिपोर्ट तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांचे रिपोर्ट सोबत आणावेत. जास्तीत जास्त गरजू बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच पूर्वनोंदणी करून शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
अधिक माहिती व पूर्वनोंदणीसाठी संपर्क : श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी दूरध्वनी : ०२४२३-२५८६६६ / ९९७०७ ९४३४०

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles