सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत नेमळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या ज्युनियर ॲथलेटिक्स मीटमध्ये विद्यालयाच्या १८ वर्षांखालील मुला-मुलींनी उल्लेखनीय यश संपादन केले.

१८ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दाजी कापडी हिने १००० मीटर धावणे तसेच लांब उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. प्राची दत्ताराम राऊळ हिने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपल्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.

तर १८ वर्षांखालील मुलांच्या गटात ऋतुराज राजन वराडकर याने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. सोहम राजन मडवळ यानेही भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आर्या कापडी, प्राची राऊळ आणि ऋतुराज वराडकर या तीन खेळाडूंची डेरवण, रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना पालक दाजी कापडी व राजन मडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पांडुरंग दळवी सरांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. राज्यस्तरीय स्पर्धेतही नेमळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



