मुंबई / सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तसेच मतदारसंघातील 33 केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

4 ऑगस्ट 2026 रोजी एम.एस.आर.डी.सी. कार्यालय, सातवा मजला, निर्मल भवन, मुंबई येथे झालेल्या या बैठकीत सावंतवाडी मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केसरकर यांच्या विनंतीनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार दीपक केसरकर, महावितरण व महापारेषणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), महावितरण-महापारेषणचे संचालक, रत्नागिरी व कराड विभागाचे मुख्य अभियंते, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जंगलपट्ट्यामुळे वीजपुरवठ्याला वारंवार फटका –
दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांतील मोठा भाग हा जंगल व झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात, तर फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजतारा तुटणे, विद्युत खांब पडणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात.
या पार्श्वभूमीवर 33 केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत केल्यास झाडे व वादळामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येईल, तसेच वीजपुरवठा अधिक सुरळीत व स्थिर राहण्यास मदत होईल, असा मुद्दा आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत ठामपणे मांडला.
सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश –
मतदारसंघातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच तातडीच्या स्वरूपातील इतर उपाययोजनांबाबतही आवश्यक निर्देश देण्यात आले.
दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील 33 केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजखंडित होण्याच्या समस्येला कायमस्वरूपी तोडगा मिळण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



