आ. केसरकरांच्या दमदार पाठपुराव्याला सुवर्ण यश, तिलारीच्या पाण्याला सौरऊर्जेची जोड! ; सावंतवाडी-वेंगुर्ला भागाला मोठा दिलासा! ; वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ व तिलारी सौर पाणीपुरवठा योजनेला वेग; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश.

मुंबई / सावंतवाडी : तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना तसेच तिलारी पाणीपुरवठा योजना टप्पा-१ सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला आता वेग येण्याची शक्यता आहे. या दोन्ही योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व त्यांच्या उपस्थितीत ४ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या योजनांना नाबार्डअंतर्गत प्रस्तावित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार शासनाच्या वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस मंत्री गुलाबराव पाटील, आमदार दीपक केसरकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, नाबार्ड पुणेचे सहाय्यक महाप्रबंधक, सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

१५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश –

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या १५ दिवसांत नाबार्ड योजनेअंतर्गत मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करावा, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली, न्हावेली तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावांवरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या गावांसह सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा समावेश वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजनेत करून त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांत मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पर्यटन, उद्योगांना मिळणार मोठी चालना –

या योजनेमुळे वेंगुर्ला-चिपी परिसरातील उद्योगधंदे, हॉटेल व्यवसाय, पर्यटन व्यवसाय तसेच स्थानिक नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात चिपी विमानतळाच्या विस्ताराच्या दृष्टीनेही ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विशेषतः मार्च ते मे या उन्हाळ्याच्या कालावधीत किनारपट्टी भागातील अनेक गावांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. प्रस्तावित योजनेमुळे या गावांची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

एकूणच, तिलारीच्या पाण्याचा प्रभावी वापर आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबईतील ही बैठक सावंतवाडी-वेंगुर्ला-चिपी परिसरासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles