मोती तलावात उडी घेऊन दुर्दैवी मृत्यू झालेला युवक वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावाचा. ; १५ वर्षीय शाळकरी युवतीचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमचे प्रयत्न सुरू.

सावंतवाडी : शहरातील श्रीराम वाचन मंदिरासमोरील मोती तलावात शाळकरी युवतीने उडी घेतल्यानंतर तिच्या बचावासाठी एका युवकानेही तलावात उडी घेतल्याची थरारक घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पाण्यातून युवकाला बाहेर काढण्यात आले; मात्र तो मृत झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तलावात उडी घेतलेल्या १५ वर्षीय युवतीचा शोध अद्याप सुरू आहे.

रोहन गोसावी (२५, रा. सरदारवाडी, नाधवडे, ता. वैभववाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. तर लिशा भिकाजी गोसावी (१५, रा. कारीवडे, ता. सावंतवाडी) असे बेपत्ता असलेल्या युवतीचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीने मोती तलावात उडी घेतल्यानंतर काही क्षणांतच रोहन गोसावी यानेही पाण्यात उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत युवकाला पाण्याबाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, संबंधित युवती आणि रोहन गोसावी हे नातेवाईक असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य एका युवतीने दिली. युवती पाण्यात पडताच तिला वाचविण्याच्या प्रयत्नात रोहनने तलावात उडी घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र या बचाव प्रयत्नात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

युवतीने तलावात उडी का घेतली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिने स्वतःहून उडी घेतली की तलावाच्या कठड्यावरून पाय घसरून ती पाण्यात पडली, याबाबतही निश्चित माहिती मिळालेली नाही. घटनेपूर्वी संबंधित युवती तलावाच्या रेलिंगवर बसलेली असल्याचा फोटो प्राप्त झाल्याने या घटनेचे गूढ अधिक वाढले आहे.

दरम्यान, युवतीचा शोध घेण्यासाठी बाबल आल्मेडा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून मोती तलावाच्या पाण्यात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य युवतीकडे चौकशी करून घटनेची माहिती घेतली जात आहे.

युवतीचा शोध लागल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोती तलावातील या घटनेमुळे सावंतवाडी शहरात एकच खळबळ उडाली असून, युवती सुखरूप सापडावी यासाठी रेस्क्यू पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles