सावंतवाडी बसस्थानकातील अनागोंदीवर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची ‘अचानक धडक’! ; शाळकरी मुलांची हेळसांड, बसफेऱ्यांचा खोळंबा अन् महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, दोषींवर कारवाईचे आदेश, ‘पिंक रिक्षा’साठीही पाठपुरावा.

सावंतवाडी : प्रवाशांच्या समस्या केवळ कागदोपत्री ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जाणून घेण्याची भूमिका घेत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी मंगळवारी सावंतवाडी बसस्थानकाला अचानक भेट देत पाहणी केली. या धडक पाहणीत बसस्थानकातील अनेक अनागोंदी प्रकार समोर आले. विशेषतः शाळकरी मुलांची होणारी हेळसांड, बसफेऱ्यांचे अनियमित नियोजन, रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि वेंगुर्ला डेपो परिसरातील गैरप्रकार याबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कारवाईचे निर्देश दिले.

‘बस फुल’ सांगून विद्यार्थ्यांना नकार; कंडक्टरवर कारवाईचे आदेश –

सायंकाळी सात वाजत आले तरी बसस्थानकातच अडकून पडलेल्या शाळकरी मुलांशी नगराध्यक्षांनी थेट संवाद साधला. यावेळी बस फुल असल्याचे कारण देत कंडक्टरने लोकल बसमधून मुलांना घेण्यास नकार दिल्याची बाब समोर आली. त्यातच त्यानंतरची सात वाजताची बसफेरीही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती.

या प्रकाराची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आगारप्रमुख कुबडे मॅडम यांना दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि त्यांच्या वेळेशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रात्रीची ‘सरप्राइज’ पाहणी

काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एका मुलीने बसस्थानकात महिलांना सुरक्षित वाटत नसल्याची तसेच काही गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार नगराध्यक्षांकडे केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत श्रद्धाराजे भोंसले यांनी रात्रीच्या वेळीच बसस्थानकाची अचानक पाहणी केली.

या पाहणीत वेंगुर्ला डेपो परिसरात काही व्यक्ती दारू पिऊन बसत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय सावंतवाडी डेपोतून सुटणाऱ्या बस नियोजित वेळेत निघत नसणे आणि काही फेऱ्या विनाकारण रद्द होणे, या बाबींवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नगराध्यक्षांसह सभापती व नगरसेविकांनी आगारप्रमुखांशी चर्चा करून बसफेऱ्यांचे काटेकोर नियोजन, वेळेवर गाड्या सोडणे आणि अनावश्यक फेऱ्या रद्द न करण्याच्या सूचना दिल्या.

महिला पोलिसांचा बंदोबस्त; रात्रीच्या बससेवेसाठी कडक नियोजन

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगराध्यक्षांनी यापूर्वीच सावंतवाडी पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याशी पत्रव्यवहार करून बसस्थानकासाठी दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलची मागणी केली आहे.

तसेच सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर वेंगुर्ला बसस्थानकावर लागणाऱ्या सर्व गाड्या वरच्या डेपोतूनच सुटतील, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना आगारप्रमुखांना देण्यात आल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थिनी आणि मुलींना अधिक सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

यासाठी आगारप्रमुख कुबडे मॅडम स्वतः सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मागणीसाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगण्यात आले.

महिलांसाठी ‘पिंक रिक्षा’ किंवा विशेष टॅक्सी सेवेचा प्रस्ताव

ग्रामीण भागातून शिक्षण, नोकरी तसेच विविध कामांसाठी सावंतवाडीत येणाऱ्या महिला व मुलींना रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी नगराध्यक्षांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

सावंतवाडीत ‘पिंक रिक्षा’ अथवा विशेष महिला टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला.

महिला सुरक्षेबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय, बससेवेतील अनियमितता आणि प्रवाशांच्या मूलभूत प्रश्नांवर नगराध्यक्षांनी घेतलेली ही थेट भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

या पाहणीदरम्यान नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.

प्रवाशांच्या तक्रारींकडे कानाडोळा न करता थेट बसस्थानकात पोहोचून वस्तुस्थिती जाणून घेत कारवाईचे निर्देश देण्यात आल्याने, आता बससेवेत प्रत्यक्ष किती सुधारणा होते याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles