बौद्ध धम्म विज्ञानाधिष्ठित अन् कल्याणकारी! : दिलीप जाधव यांचे प्रतिपादन. ; सातोसेत वर्षावास प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✍️ मोहन जाधव.

सावंतवाडी : बौद्ध धम्म हा केवळ पारंपरिक धार्मिक विचार नसून विज्ञानावर आधारित आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारा धम्म आहे. भारतभूमीत जन्मलेला हा धम्म पुढे जगभर पोहोचला; मात्र कालौघात तो भारतापासून काहीसा दूर गेला. अशा परिस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या माध्यमातून भारतीयांना बौद्ध धम्माची नव्याने ओळख करून दिली. मानवी दुःखमुक्तीसाठी बौद्ध धम्म हे आजारावरील औषधाप्रमाणे प्रभावी मार्गदर्शन करणारे तत्त्वज्ञान आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनमालेतील चौथे प्रवचन रविवारी सातोसे-जाधववाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना दिलीप जाधव बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी संस्कार विभागाचे सचिव मिलिंद नेमळेकर तसेच प्रवचनकार गणपत जाधव उपस्थित होते. गणपत जाधव यांनी ‘बौद्धाची आचारसंहिता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर मिलिंद नेमळेकर यांनी वर्षावासाचे महत्त्व, बुद्ध धम्माचा जागतिक विस्तार आणि त्यामागील मानवतावादी विचारधारा यावर प्रकाश टाकला.

“जगाला आज युद्ध नको, बुद्ध हवा!”

मिलिंद नेमळेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात बुद्धाच्या धम्माने जगभरात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. आजच्या संघर्षमय परिस्थितीत मानवतेला युद्धाची नव्हे, तर शांतता, करुणा आणि समतेची शिकवण देणाऱ्या बुद्धविचारांची गरज आहे, असे सांगत “जगाला आज युद्ध नको, बुद्ध हवा” असा संदेश त्यांनी दिला. अलीकडील आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवरही बुद्धाच्या शांततावादी विचारांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बौद्ध धम्म हा अंधश्रद्धेपेक्षा विवेक, तर्क, अनुभव आणि विज्ञाननिष्ठ विचारांना महत्त्व देणारा धम्म असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजन जाधव व त्यांच्या पत्नी अर्चना जाधव यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंकर जाधव यांनी प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी सेक्रेटरी चंद्रशेखर जाधव, गणपत जाधव, गौरव जाधव, महिला विभागाच्या खजिनदार अश्विनी जाधव, संघटक प्रतिभा जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रशेखर जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शंकर जाधव यांनी आभार मानले. या प्रवचन कार्यक्रमाला सातोसे-जाधववाडी परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. शांतता, समता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या वर्षावास प्रवचनामुळे परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles