सावंतवाडी : विकासाच्या गप्पा आणि आश्वासनांच्या वल्गना कितीही झाल्या, तरी नेमळे गावातील गावकर-कुंभारवाडी परिसरातील धनगरवाडी मात्र आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. या वाडीत ये-जा करण्यासाठी साधी पायवाटही उपलब्ध नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाट तुडवावी लागत आहे. तीस वर्षांपासून सुरू असलेली ही पायपीट अखेर कधी थांबणार? असा संतप्त सवाल धनगरवाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
धनगरवाडीतील एखादा नागरिक आजारी पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली, तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. रुग्णाच्या घरापासून तब्बल सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत रुग्णाला उचलून अथवा आधार देत ग्रामीण रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यानंतर रिक्षा किंवा अन्य वाहनाची मदत घेऊन रुग्णालय गाठावे लागते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रस्त्याअभावी रुग्णांच्या जीवितालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

शाळकरी मुलांच्या शिक्षणावरही या गैरसोयीचा परिणाम होत आहे. पावसाळ्यात चिखल, निसरडी वाट आणि पाण्याचा प्रवाह यामुळे विद्यार्थ्यांची वाटचाल अधिकच धोकादायक बनते. महिला, वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवरही रस्त्याअभावी मोठी मर्यादा येत आहे.
निवडणूक आली की आश्वासनांची लगबग; निवडणूक संपली की धनगरवाडी विस्मृतीत!
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्या की धनगरवाडीतील मतांची आठवण अनेकांना होते, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी वाडीत येतात, सभा घेतात, “तुमचा रस्ता मंजूर झाला आहे”, “आम्हीच रस्ता करून देणार” अशी आश्वासने दिली जातात. काही वेळा विविध प्रलोभने दाखवून मतांचे राजकारणही केले जाते.
मात्र निवडणुकीचा निकाल लागला की या आश्वासनांचा आवाजही शांत होतो आणि पुढील पाच वर्षे धनगरवाडी पुन्हा दुर्लक्षितच राहते, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. “आपल्या फायद्यासाठी वापरायचे आणि निवडणूक संपली की विसरून जायचे,” अशीच अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
आश्वासनांच्या पायवाटेवरून विकासाच्या रस्त्याकडे कधी?
गेल्या तीस वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही प्रश्न कायम असल्याने धनगरवाडीतील नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना आपल्या वाडीपर्यंत साधा रस्ता पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“आमच्या रस्त्याचा जाब कोणाला विचारायचा? आमचा रस्ता कोण करून देणार? आमच्या मुलांना, महिलांना आणि वृद्धांना अजून किती वर्षे ही पायपीट करावी लागणार?” असा आर्त सवाल धनगरवाडीतील ग्रामस्थांनी केला आहे.
आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून धनगरवाडीला हक्काचा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तरी धनगरवाडीच्या वाटेला विकासाचा रस्ता मिळणार का, की आश्वासनांची पायवाटच ग्रामस्थांच्या नशिबी राहणार? याकडे संपूर्ण धनगरवाडीचे लक्ष लागले आहे.



