रानभाज्यांच्या सुगंधाने फुलली सावंतवाडी नं. ६ शाळा! ; वृक्षारोपण, वृक्षरक्षाबंधन, औषधी वनस्पतींची ओळख अन् पौष्टिक पदार्थांची मेजवानी! ; विद्यार्थ्यांनी अनुभवला निसर्गसंवर्धनाचा अनोखा धडा!

सावंतवाडी : निसर्गाशी नाते जोडत पारंपरिक रानभाज्या, औषधी वनस्पती आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना कृतीतून समजावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ६ येथे रानभाजी महोत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. रानभाजी महोत्सवासोबतच वृक्षारोपण, वृक्षरक्षाबंधन, औषधी वनस्पतींची ओळख आणि विविध पौष्टिक पदार्थांची मेजवानी अशा विविध उपक्रमांनी शाळेचा परिसर अक्षरशः निसर्गमय झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, माजी केंद्रप्रमुख सरिता मुननकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समिक्षा खोचरे, उपाध्यक्षा पूनम तुयेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, गुरुप्रसाद तेजम, जान्हवी वारीक, संगिता चव्हाण, ज्येष्ठ शिक्षिका सायली लांबर तसेच मुख्याध्यापक केशव जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाळेच्या आवारातील कल्पवृक्षाला विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वतः तयार केलेली पानाफुलांची पर्यावरणपूरक राखी बांधली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देत ‘वृक्ष वाचवा, निसर्ग वाचवा’ असा संकल्प केला. निसर्गाप्रती कृतज्ञता विद्यार्थ्यांनी गाणे आणि कृतीच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त केली.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात अळूची पाने, शेवगा, कर्टुले, केळफूल, भारंगी, अंबाडी, टाकळा, चिवारीचे कोंब, पेवगा, कुर्डू, भोपळ्याची फुले, त्रिफळे अशा विविध रानभाज्यांची माहिती व मांडणी करण्यात आली होती. त्यासोबतच पानफुटी, गवती चहा, तुळस, ओवा, वेखंड, अडुळसा, सुरपीन आदी औषधी वनस्पतींचीही विद्यार्थ्यांनी ओळख करून घेतली.

विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नाचणीची भाकर, अळुवड्या, पातोळ्या, शेवग्याची भाजी यांसारख्या पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांची केलेली रुचकर मांडणी. रानभाज्यांपासून तयार होणारे विविध पदार्थ पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे भरभरून कौतुक केले. उपस्थितांनी या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत रानभाज्यांचे आहारातील महत्त्वही जाणून घेतले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रानभाज्या या केवळ पारंपरिक खाद्यपदार्थ नसून आरोग्य, पोषण आणि निसर्गाशी असलेले आपले नाते जपणाऱ्या मौल्यवान देणगी आहेत, असे सांगत विद्यार्थ्यांना स्थानिक आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून दिले. या उपक्रमासाठी मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती सायली लांबर तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

दरम्यान, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर यांचा वाढदिवस फुलझाड भेट देऊन पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच माजी केंद्रप्रमुख श्रीमती सरिता मुननकर यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी एक हजार रुपयांची मदत देत आपला स्नेह व्यक्त केला.

हा सुंदर आणि अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सायली लांबर, मुख्याध्यापक केशव जाधव, गुरुप्रसाद तेजम, समिक्षा खोचरे, पूनम तुयेकर, जान्हवी वारीक, प्रांजल जाधव, पूनम गौंड, मेघा शर्मा यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सायली लांबर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. रानभाज्यांच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि आपल्या मातीतल्या पारंपरिक ज्ञानाची सांगड घालणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles