सम्राट क्लबला सर्वतोपरी सहकार्य करू अन् सावंतवाडीच्या वैभवशाली कला-संस्कृतीचा वारसा पुढे नेऊ! : युवा नेते विक्रांत सावंत यांचे अभिवचन. ; सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचा दिमाखदार शुभारंभ!

सावंतवाडी : “सिंधुदुर्गला गौरवशाली परंपरा लाभली आहे आणि सावंतवाडी शहराला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. या वैभवशाली परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन झालेल्या सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनला माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. संस्थेचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य या दोन्ही भूमिकांतून क्लबच्या विधायक वाटचालीसाठी शक्य ते सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे ठाम अभिवचन युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिले.

आर.पी.डी. हायस्कूलच्या सभागृहात रविवारी झालेल्या ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’ च्या स्थापना व पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. “सावंतवाडीच्या कला-संस्कृतीला नवी उंची आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याची क्षमता या नव्या व्यासपीठात आहे,” असा विश्वास व्यक्त करत विक्रांत सावंत यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

ऐतिहासिक वारसा, समृद्ध कला-संस्कृती आणि शैक्षणिक परंपरेची पताका अभिमानाने मिरविणाऱ्या सावंतवाडीच्या सांस्कृतिक क्षितिजावर रविवारी एका नव्या पर्वाची दिमाखदार सुरुवात झाली. ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’ या नव्या क्लबची स्थापना व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या माध्यमातून कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्राला संघटित व्यासपीठ देत समाजहिताचे विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

नरेंद्र देशपांडे यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा –
सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’ची स्थापना करण्यात आली. चार्टर्ड प्रेसिडेंटपदी सम्राट नरेंद्र देशपांडे यांची निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या नव्या वाटचालीला प्रारंभ झाला आहे. भावी अध्यक्षपदी पत्रकार हरिश्चंद्र पवार, तर सचिवपदी प्रा. प्रतिभा चव्हाण यांची वर्णी लागली आहे.
तसेच उपाध्यक्षपदी पृथ्वीराज प्रताप, खजिनदारपदी सुनील राऊळ, संचालकपदी स्मिता केंकरे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. सोनल लेले व गुरुप्रसाद चिटणीस, जनसंपर्क अधिकारी दादा मडकईकर, ऑडिटर कौस्तुभ पेडणेकर आणि प्रोग्राम डायरेक्टर ॲड. सिद्धी परब यांची निवड करण्यात आली.

कला-संस्कृतीच्या संवर्धनासह शिक्षणाला बळ –
स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, सावंतवाडीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देणे, या तीन प्रमुख ध्येयांना केंद्रस्थानी ठेवून क्लब विविध विधायक उपक्रम राबविणार आहे.
कला, संस्कृती आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील विविध उपक्रमांना चालना देत समाजातील सर्व स्तरांपर्यंत सकारात्मक विचार आणि विधायक कार्य पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. त्यामुळे सावंतवाडीच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळीला या नव्या क्लबच्या माध्यमातून नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा –
या सोहळ्याला सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सम्राट धर्मा व्ही. चोडणकर (इन्स्टॉलेशन ऑफिसर व डायरेक्टर क्लब एक्स्टेंशन, सम्राट क्लब इंटरनॅशनल), सम्राट शशिकांत पुनाजी यांच्यासह सम्राट परिवारातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 
सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष सम्राट नरेश पेडणेकर यांनी प्रास्ताविक करत नव्या क्लबच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी अध्यक्ष अर्जुन नाईक यांच्यासह गोवा येथील सम्राट टीमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडीच्या कला-संस्कृतीला नवा मंच, शिक्षणाला नवी दिशा आणि समाजसेवेला नवी ताकद देण्याच्या निर्धाराने ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’च्या नव्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ झाला.

 

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles