बांदा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण गोरत्न फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचे अनावरण उत्साहात करण्यात आले. यावेळी बांदा गडगेवाडी येथील स्त्री शक्ती महिला भजन मंडळ तसेच अनिरुद्ध उपासना केंद्र, बांदा यांना भजन साहित्य देखील प्रदान करण्यात आले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गणेशोत्सवाची ओळख असलेल्या आकर्षक टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला शैलेश लाड, मनोज साळगावकर, गुणेश गवस, संजय भाईप, राकेश परब, महादेव सावंत, नीलेश मोरजकर, सौ वर्षा आगलावे, मनोज रेडकर, महेश नाईक, सौ शुभांगी कुडव यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी, अनिरुद्ध उपासना केंद्राचे सदस्य तसेच स्त्री शक्ती महिला भजन मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शैलेश लाड म्हणाले, गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे. उत्सव साजरा करताना केवळ देखावा आणि मनोरंजनावर भर न देता समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची गरज आहे. तरुणाईने पुढाकार घेतला, महिला शक्तीने सहभाग घेतला आणि विविध संस्था एकत्र आल्या, तर आपल्या परिसरात निश्चितच चांगले सामाजिक परिवर्तन घडू शकते. कोकण गोरत्न फाऊंडेशनचा हा टी-शर्ट केवळ उत्सवाची ओळख नसून सामाजिक एकतेचा संदेश देणारा आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त प्रत्येकाने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि गरजूंच्या मदतीचा संकल्प करावा.
गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



