मुंबई : मंगळवारी पार पडलेल्या सामन्यानंतर विनेश फोगाटसह संपूर्ण भारताचा एक सुवर्णप्रवास सुरु झाला होता. रौप्य पदकतर निश्चित झालंच होतं, पण एका गोल्डन स्वप्नाचे सगळ्यांनाच वेध लागले होते. पण अवघे काही तास बाकी असतानाच एक बातमी येऊन धडकली आणि विनेशसह संपूर्ण भारतीयांच्या ‘गोल्ड’न स्वप्नांचा चुराडा झाला. फक्त काही ग्रॅमसाठी विनेशला पॅरिस ऑलम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. ही बाब भारतीयांसाठी जितकी जिव्हारी लागली त्यापेक्षा जास्त लेकीच्या मेहनतीसाठी हळहळ व्यक्त केली गेली.
ऑलम्पिकमधील सुवर्ण पदकाचं जे स्वप्न भंगलं त्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात निराशा दिसली. सिनेसृष्टीतूनही विनेशसाठी ज्यांनी ज्यांनी कौतुक केलं त्या साऱ्यांनी पाठिंब्यासाठी पावलंही उचलली. त्यामुळे जरी काही ग्रॅमसाठी तिचं ऑलम्पिक पदक हुकलं असेल तरी भारताच्या या लेकीची कामगिरीची ही सुवर्णाअक्षरातच लिहिली गेली आहे.
सिनेसृष्टी विनेशच्या पाठीशी
मराठीसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी विनेशसाठी केलेल्या पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे. अनेकांनी तिच्यासाठी धीराचे शब्द लिहिले, तर काहींनी ज्या मुद्द्यावर विनेशला अपात्र ठरवण्यात आलं त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तेजस्विनी पंडित, अभिजीत केळकर या मराठी कलाकारांनी तर आलिया भट्ट, स्वरा भास्कर, प्रिती झिंटा या बॉलिवूडच्या कलाकारांनी विनेशसाठी पोस्ट केली आहे.
अभिजीत केळकर, तेजस्विनी पंडीतची पोस्ट
अभिजीतने विनेशसाठी पोस्ट करत म्हटलं की,’तुझं अपात्र होणं हे आमच्या जिव्हारी लागंलय.’ त्याचप्रमाणे तेजस्विनीनेही विनेशचा फोटो शेअर करत, ‘आम्ही खरंच तुझ्या लायक आहोत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. पुढे तिने म्हटलं की, ‘100 ग्रॅमने 100 बिलियन्स हृदय तोडली आहेत. पण तरीही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. तु आमच्यासाठी चॅम्पियनच आहेस.’
प्रत्येक भारतीयांसाठी तू लखलखणारं सोनं – प्रिती झिंटा
प्रितीनेही विनेशाचा फोटो पोस्ट करत म्हटलं की, प्रिय विनेश फोगाट, तुला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी तू लखलखणारं सोनं आहेस. तू विजेत्यांची विजेती आणि भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी ‘हिरो’ आहेस. तुझ्याबाबतीत ज्याप्रकारे गोष्टी घडल्या, त्यासाठी वाईट वाटतंय. स्ट्राँग राहा आणि पुन्हा हिंमतीने उभी राहा. आयुष्य नेहमीच न्याय देते असं नाही…कठीण काळ टिकत नाही. पण, कठीण लोक टिकतात. मला आता तुला मिठी माराविशी वाटतेय आणि तुला सांगांवसं वाटतंय की आम्हाला तुझा गर्व आहे.
आलियाचे विनेशसाठी धीराचे शब्द
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील विनेशसाठी धीराचे शब्द लिहिले आहेत. आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘विनेश फोगाट तू संपूर्ण देशासाठी खूप मोठी प्रेरणा आहे.हा इतिहास रचण्यासाठी केलेला तुझा संघर्ष, तुझी जिद्द आणि तुझी कठोर मेहनत तुझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण तूच सोनं आहे आणि हे तुझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्यासारखं कुणीच नाही.’
स्वरा भास्करने उपस्थित केला सवाल
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने विनेशच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. विनेश ही 50 किलो वजनी गटात कुस्ती खेळत होती. पण तिच्या अंतिम सामन्यावेळी जेव्हा तिचं वजन करण्यात आलं तेव्हा ते फक्त 100 ग्रॅम जास्त भरलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे यावर स्वरा भास्कर हिने सवाल उपस्थित केला आहे. तिने म्हटलं की, ‘या 100 ग्रॅम वजनाच्या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसेल? ‘