मळेवाड : मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये भविष्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना आतापासूनच प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी व्यक्त केले. उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करून पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बंधारे, वनराई बंधारे, छोटे नालेबंधारे आणि अन्य जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडणारे पाणी वाहून थेट समुद्राला मिळण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे. यासाठी गावागावांत उपलब्ध जलस्रोतांचा अभ्यास करून योग्य ठिकाणी बंधारे व नालेबंधारे उभारल्यास पाण्याचा साठा वाढण्यासोबतच भूजलपातळीतही वाढ होण्यास मदत होईल. परिणामी शेतीसाठी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या स्रोतांना बळकटी मिळू शकते.
वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे भविष्यात पाण्याचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजपासूनच दूरदृष्टीने नियोजन करून जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाच्या गरजेनुसार जलसंधारणाची कामे निश्चित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सातोसकर यांनी सांगितले.
यासाठी ग्रामपंचायती, जलसंधारण विभाग तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असून, स्थानिक पातळीवरील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागालाही चालना देणे महत्त्वाचे आहे.
मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेषतः वनराई बंधारे व छोटे बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ठाम ग्वाही जि. प. सदस्य अपर्णा सातोसकर यांनी दिली.



