जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृहाचा बोजवारा, नागरिकांच्या गैरसोयीचा संताप अखेर नगरपालिकेच्या दारात! ; ज्ञानेश्वर पाटकर, अभिजित गवस यांच्या पाठपुराव्याला यश! ; आठवडा बाजारापूर्वी दुरुस्तीचे पालिकेचे आश्वासन.

सावंतवाडी : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणि लहान मुलांसाठी आनंदाचे ठिकाण असलेल्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृह गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून बंद व दुरवस्थेत असल्याचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिक आणि आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ही बाब सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर यशवंत पाटकर आणि अभिजित दत्ताराम गवस यांच्या निदर्शनास आली. नागरिकांच्या दैनंदिन गरजेशी निगडित असलेल्या या प्रश्नाची तातडीने दखल घेत त्यांनी नगरपालिकेचे कर्मचारी संजय पोईपकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र, माहिती देऊनही सुमारे दहा दिवस ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती.

अखेर नागरिकांच्या गैरसोयीचा हा प्रश्न घेऊन पाटकर आणि गावस यांनी आज नगरपालिकेत धडक दिली. सहकाऱ्यांसह त्यांनी संबंधित प्रशासनाकडे या प्रश्नाबाबत जाब विचारत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधेशी संबंधित प्रश्न असल्याने प्रशासनानेही या बाबीची दखल घेत झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान, आठवडा बाजार सुरू होण्यापूर्वी जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृहाची स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल आणि ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्याच्या स्थितीत आणले जाईल, असे आश्वासन नगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आले.

‘उद्यान सुंदर, पण सुविधा कुठे?’

उद्यानाची स्वच्छता, देखभाल आणि नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा याकडे प्रशासनाने नियमित लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आठवडा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने स्वच्छतागृह ही ऐच्छिक नव्हे, तर मूलभूत गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

“नागरिकांनी वारंवार समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतरच सुविधा दुरुस्तीच्या हालचाली होऊ नयेत. पालिकेने उद्यानातील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीची कायमस्वरूपी व्यवस्था करावी,” अशी मागणी ज्ञानेश्वर पाटकर आणि अभिजित गवस यांनी केली.

पालिकेने दिलेल्या आश्वासनामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles