सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) : गावाच्या विकासाचा कारभार ज्या ग्रामपंचायतीच्या खांद्यावर असतो, त्याच ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना आपल्या प्रश्नांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असतील, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. वराड ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांची कथित गैरहजेरी, सरपंचांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आणि उपसरपंचांना विश्वासात न घेता प्रशासकीय पत्रव्यवहार होत असल्याच्या आरोपांमुळे गावातील वातावरण तापले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायत वराडचे ग्रामसेवक श्री. खोबरेकर हे गावातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, सभा अथवा कायदेशीर पत्रव्यवहारासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता अनेकदा उपस्थित नसतात, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अन्य ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे कारण सांगून ते वराड ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे गावातील महत्त्वाची कामे रखडत असून ग्रामस्थांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामसेवकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ‘थोड्या वेळाने फोन करतो’ असे सांगून नंतर फोन बंद ठेवला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, गावातील गंभीर प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर दाद मागायची तरी कोणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

सरपंचांच्या गैरहजेरीचा मुद्दाही ऐरणीवर!
या तक्रारीत विद्यमान सरपंच श्रीमती रावले यांच्या अनुपस्थितीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दिनांक १६ व १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांकडे कोणतेही अधिकार सोपविण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी उपसरपंचांकडे विचारणा केली असता, सरपंच आणि ग्रामसेवक आपल्याला कोणत्याही विषयात विश्वासात न घेता पत्रव्यवहार करीत असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे उपसरपंच या नात्याने आपण कोणताही कायदेशीर पत्रव्यवहार करू शकत नसल्याचेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितल्याचे निवेदनात नमूद आहे.

देवस्थान ट्रस्ट आणि गावकर मंडळींचाही सवाल! –
ग्रामपंचायत हद्दीतील श्री देव वेताळ व इतर देवस्थान, देवस्थान ट्रस्ट, पालटदार, गावकर, भावकर मंडळी तसेच समस्त ग्रामस्थांना प्रशासकीय कामांसाठी अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर आपल्या न्याय्य मागण्या मांडायच्या तरी कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबत चौकशी करावी, सरपंचांच्या अनुपस्थितीबाबत आवश्यक ती माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायत ही गावाच्या लोकशाही कारभाराचा पाया आहे. मात्र, याच व्यवस्थेत ग्रामस्थांना आपल्या प्रश्नांसाठी दारोदार फिरावे लागत असल्याची भावना निर्माण होत असेल, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते आणि वराड ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
(टीप – सदर आरोप व तक्रारी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर आधारित असून, संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांची बाजू समोर आलेली नाही.)



