सावंतवाडी : तरुण वयातच सामाजिक कार्याचा वसा घेत, संघटनात्मक बांधिलकी आणि मैत्रीची नाती जपणारा एक उमदा युवा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा सामाजिक युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार (वय ३१) यांचे आज (ता. १८) सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने सावंतवाडीच्या राजकीय, सामाजिक आणि युवा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशिष सुभेदार यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर गोवा येथील बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांच्यावर काळाने घातलेला हा घाला त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे.
माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांचे ते अत्यंत विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पक्षसंघटनेप्रती असलेली निष्ठा, नेतृत्वावरील विश्वास आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांची खास ओळख होती. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडी तालुक्यात विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. तरुणांना सोबत घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड नेहमीच दिसून येत असे.
राजकीय क्षेत्रातील सक्रियता असो वा सामाजिक कार्यातील सहभाग, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने केवळ एका राजकीय संघटनेचा कार्यकर्ता हरपला नसून, समाजासाठी धडपडणारा, मित्रांसाठी धावून जाणारा आणि तरुणाईला सोबत घेऊन चालणारा एक उमदा सहकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अवघ्या ३१ वर्षांचे आयुष्य… असंख्य स्वप्ने… समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द… आणि अचानक काळाने हिरावून नेलेला एक हसतमुख चेहरा!
आशिष सुभेदार यांच्या निधनाने सावंतवाडीच्या युवा चळवळीतील एक उमदा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.
सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!



