सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेला मिळणार शस्त्रक्रियेचे नवे बळ!, जनरल सर्जन डॉ. रुपेश कुमार झा रुजू. ; नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत! ; लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्रीसाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार!

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. रुग्णांना दर्जेदार आणि आधुनिक शस्त्रक्रिया सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने जनरल सर्जन तथा पोटातील विकारांचे तज्ज्ञ डॉ. रुपेश कुमार झा सोमवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाले. त्यांच्या आगमनामुळे परिसरातील रुग्णांना विशेषतः पोटाच्या विकारांवरील शस्त्रक्रियांसाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी तथा विद्यमान नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. झा यांचे स्वागत केले. त्यांच्या अनुभवाचा आणि विशेष कौशल्याचा लाभ सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना मिळणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या स्वागतप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर, माजी सैनिक अधिकारी दीपक शिर्के, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी रूपाली हेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईच्या जे. जे. रुग्णालयापासून अंबाजोगाईपर्यंत शिक्षणाचा प्रवास!

डॉ. रुपेश कुमार झा हे मूळचे बिहार राज्यातील असून त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित जे. जे. रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई (जि. बीड) येथून एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर आता ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत.

लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेत विशेष प्रावीण्य!

डॉ. झा यांचे विशेष कौशल्य म्हणजे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया. पोटातील विविध विकारांवर उपचार करण्याबरोबरच अपेंडिक्स, हर्निया यांसारख्या आजारांवरील शस्त्रक्रिया आधुनिक लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्याचे त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. ही सुविधा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्यास रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होऊन स्थानिक स्तरावरच आधुनिक उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्रीसाठी आमदार केसरकरांच्या माध्यमातून प्रयत्न!

दरम्यान, या आधुनिक शस्त्रक्रिया सुविधेसाठी आवश्यक असलेली लॅप्रोस्कोपी यंत्रसामग्री लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून ही यंत्रसामग्री मंजूर करून घेण्याचे आश्वासन रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी तथा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी आणि जनरल सर्जन डॉ. रुपेश कुमार झा यांना दिले.

तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती आणि आधुनिक शस्त्रक्रिया सुविधांसाठी होणारे प्रयत्न यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आपल्या परिसरातच मिळावेत, या अपेक्षेला आता बळ मिळाले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles