सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली हेच आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री. तेली यांचा प्रचार करावा असे आदेश दिले आहेत. तसेच वेगळ्या वाटा निवडलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी चार दिवसांत पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील व्हावं. अन्यथा, अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठवावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी (श.प.) चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, तेलींच्या पाठीशी आम्ही असून ते विजयी होण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. वेगळ्या वाटा निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना चार दिवसांचा अवधी आम्ही दिलेला आहे. त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील व्हावं. ते आमचे सहकारी आहेत. अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यामुळे तसे न केल्यास पक्षाकडून महाविकास आघाडीचे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा विस्तृत अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निरीक्षकांकरवी द्यावा लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष श्री. सामंत यांना दिला.
तर कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून मी कारवाई करू शकत नाही. त्यांच्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी योगदान दिल त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीत सक्रीय व्हावं यासाठी हे आवाहन आहे. घारे या महाविकास आघाडीच्या आहेत. त्या सोबत नसतील तर आमचं नुकसान होईल. त्यांना समजावण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. जर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली असती तर उमेदवार या अर्चना घारे-परब असणार असत्या असंही जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही अर्चना घारे-परब यांना मदत केली. आज त्यांचा आदेश घारेंनी मानण आवश्यक होतं. त्यांनी दिलेल योगदान आम्ही नाकारत नाही. मात्र, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर नेत्यांचा मान ठेवण आवश्यक होतं. अवमान करता नये होता. ही सीट शिवसेनेला नियमानुसार गेली आहे. त्यामुळे वरिष्ठांच घारेंनी ऐकायला हवं होतं. शरद पवार यांच्या मनात उमेदवारी ही घारेंनाच द्यायची होती. मात्र, जागा वाटपात ते शक्य झालं नाही. तिनं पक्षांनी ठरवलेल्या तत्वानुसार हे ठरलं. ‘बॉस इस ऑलवेस करेक्ट’ हे मानणारे आम्ही राष्ट्रवादीचे सैनिक आहोत. शेवटपर्यंत घारेंसाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, आता त्यांना ”नांदा सौख्यभरे !” एवढंच आवाहान करतो असं श्री. भोसले यांनी सांगितले. तर ज्येष्ठ नेते सुरेश दळवी म्हणाले, राजन तेली हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना दोन निवडणूकांचा अनुभव आहे. यावेळी ते निश्चित विजयी होतील असा विश्वास श्री. दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, नम्रता कुबल, महिला जिल्हाध्यक्षा अँड. रेवती राणे, व्हिक्टर डॉन्टस, बाळ कनियाळकर, भास्कर परब, अँड. सायली दुभाषी, सावली पाटकर,अफरोज राजगुरू, काशीनाथ दुभाषी, डॉ. संजीव लिंगवत, सचिन पाटकर आदींसह राष्ट्रवादी श.प.चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.