मुंबई : मुंबईतील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर आज सकाळी लवकरच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. दोघेही एकाचवेळी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाले. एकमेकांना पाहिल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले.
त्यानंतर सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी सदा सरवणकर यांच्या जॅकेटवरील धनुष्यबाणाच्या निशाणीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. सदा सरवणकर यांनी जॅकेटवर लावलेला धनुष्यबाण निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग ठरण्याची शक्यता आहे.मात्र, सदा सरवणकर यांनी जॅकेटवर लावलेला धनुष्यबाणही उलटा होता.उलटा धनुष्यबाण लावूनच सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या जॅकेटवरचा धनुष्यबाण उलटा असल्याचं त्यांचेच प्रतिस्पर्धी उमेदवार अमित ठाकरेंच्या लक्षात आलं. अमित ठाकरेंनी सरवणकरांना ते तात्काळ सांगितलं आणि धनुष्यबाण सरळ करण्यासाठी मदतही केलीव्हा सरवणकर यांनी तातडीने धनुष्यबाण सरळ केला. मात्र, तोपर्यंत व्हायची ती शोभा होऊन गेली होती.